डिजिटल पेमेंट करणे महागणार? सरकारकडून UPI व्यवहारांवर ‘हे’ शुल्क लागू केले जाण्याची शक्यता

Merchant charges on UPI-RuPay | सध्या काही ठराविक यूपीआय पेमेंट अॅप्सद्वारे ग्राहकांकडून ठराविक शुल्क आकारले जात आहे. मात्र, आता सरकार UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) पुन्हा लागू करण्याचा विचार करत आहे. सध्या याद्वारे होणारे व्यवहार पूर्णपणे मोफत आहेत, परंतु बँका मोठ्या व्यावसायिकांकडून शुल्क आकारण्याचा विचार करत आहेत.
मर्चंट डिस्काउंट रेट हे डिजिटल पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुकानदारांकडून त्यांच्या बँकांना दिले जाणारे शुल्क असते. बँकांकडून याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. लहान व्यापाऱ्यांसाठी UPI पूर्वीप्रमाणेच मोफत राहील. सामान्य नागरिकांनाही व्यवहारांसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
बँकांकडून सरकारला पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार वर्षाला 40 लाख रुपयांपेक्षा जास्त विक्री असलेल्या व्यावसायिकांकडून शुल्क वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आहे. बँका आणि पेमेंट कंपन्यांचा असा युक्तिवाद आहे की जेव्हा मोठे व्यापारी आधीच व्हिसा, मास्टरकार्ड आणि क्रेडिट कार्डवर व्यापारी शुल्क भरत असतात. त्यामुळे UPI आणि RuPay कार्डवर देखील शुल्क आकारले पाहिजे.
सरकारद्वारे 2022 च्या अर्थसंकल्पात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एमडीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहोता. मात्र, आता यूपीआयचा वापर वाढला आहे. त्यामुळे या सुविधेचा खर्च उचलण्याऐवजी सरकार मोठ्या व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारू शकते.
सरकारकडून सध्या या प्रस्तावावर विचार केला जात आहे. सरकारद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांवर एमडीआर लावले जाऊ शकते. मात्र, छोट्या व्यापाऱ्यांना यात सवलत दिली जाण्याची शक्यता आहे.





