मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली? भाजप आमदारांची लवकरच बैठक

इंफाळ : मणिपूरमधील भाजप आमदारांची बैठक लवकरच बोलावली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू असणाऱ्या त्या राज्यात पुन्हा सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. मणिपूरमध्ये वांशिक संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे सुमारे २१ महिन्यांपासून त्या राज्यातील स्थिती अशांत बनली. त्यातून सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारचे नेतृत्व करणारे एन.बिरेन सिंह टीकेच्या केंद्रस्थानी आले.
अखेर सिंह यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी भाजपमध्ये बैठकांचे सत्र झाले. मात्र, नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाविषयी मतैक्य झाले नाही. त्यातून मणिपूरमध्ये नेतृत्वाचा पेच उद्भवला. तसेच, राजकीय अनिश्चितताही निर्माण झाली. त्याबाबतची कोंडी न फुटल्याने मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारीला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
भाजपकडे स्पष्ट बहुमत असूनही ती नामुष्की ओढवली. आता त्या पक्षाच्या गोटात पुन्हा सरकार स्थापनेच्या दृष्टीने पाऊले टाकली जात असल्याचे सूचित होत आहे. त्यादृष्टीने भाजप आमदारांची बैठक अतिशय महत्वाची ठरणार आहे. त्या बैठकीत नेतानिवडीविषयीचे मतैक्य निर्णायक ठरू शकते.





