थकीत बिलांच्या मुद्यावरून शासकीय कंत्राटदार आक्रमक, पुण्यात करणार आंदोलन

पुणे : थकीत बिलांच्या मागणीसाठी शासकीय कंत्राटदार पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाबाहेर गुरुवारी (दि.२७) धरणे आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनात सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील कंत्राटदार सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा काँट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले व हॉटमिक्स असोसिएशनचे संजीव पंजाबी यांनी दिली.
राज्यभरातील कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके प्रलंबित असून त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, नगरविकास,जलसंपदा विभाग आदी सर्वच विभागात कंत्राटदारांची देयके रखडली असून काही ठिकाणी कंत्राटदारानी निधीअभावी कामे थांबविली आहेत.
रस्त्यांची व महामार्गांची कामे करणाऱ्या हॉटमिक्स कंत्राटदारांची अवस्था खूप बिकट झाली असून त्यांना डांबर प्लँट बंद ठेवावे लागत आहेत, पैशा अभावी मशिनरी जागेवर उभ्या केल्या असल्याची माहिती संजीव पंजाबी यांनी दिली.
पुण्यात शासकीय इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची बिले प्रचंड प्रमाणावर थकली आहेत. या व इतर मागण्यांसाठी पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाबाहेर गुरुवारी (दि.२७) आंदोलन करण्यात येणार असल्याचे रवींद्र भोसले यांनी सांगितले.





