Mobile Safety: पावसात मोबाईल भिजला? घाबरू नका; हे उपाय केल्यास टाळता येईल हजारो रुपयांचे नुकसान
Mobile Safety तसेच फोन भिजल्यानंतर वारंवार बटणे दाबू नयेत. यामुळे पाणी आणखी आत जाऊ शकते. फोन पूर्णपणे कोरडा होईपर्यंत चार्जिंग पोर्ट, USB कनेक्शन किंवा हेडफोन जॅक वापरणेही टाळावे.

Mobile Safety: मान्सूनच्या दिवसांत अचानक पाऊस सुरू होणे ही सामान्य बाब आहे. अशा वेळी घराबाहेर असताना मोबाईल फोन भिजण्याची किंवा पाण्यात पडण्याची शक्यता वाढते. अनेकजण अशा परिस्थितीत घाबरून चुकीची पावले उचलतात आणि त्यामुळे फोनचे नुकसान अधिक वाढते. मात्र योग्य वेळी योग्य उपाय केल्यास मोबाईल सुरक्षित ठेवता येऊ शकतो.
जर तुमचा स्मार्टफोन पावसात भिजला असेल किंवा पाण्यात पडला असेल, तर सर्वप्रथम तो त्वरित बंद करा. फोन सुरू अवस्थेत राहिल्यास पाणी आतल्या सर्किटपर्यंत पोहोचून शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे फोन चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी वारंवार बटणे दाबू नयेत.
फोन बंद केल्यानंतर त्याच्याशी जोडलेल्या सर्व अॅक्सेसरीज वेगळ्या करा. शक्य असल्यास सिम कार्ड, मेमरी कार्ड आणि चार्जिंग केबल काढून कोरड्या ठिकाणी ठेवा. काही जुन्या मॉडेलमध्ये बॅटरी काढता येत असल्यास तीही वेगळी करावी. यामुळे नुकसान होण्याचा धोका कमी होतो. (Mobile Safety)
आजकाल बहुतांश स्मार्टफोनमध्ये बॅटरी काढता येत नाही. अशा वेळी फोन पूर्णपणे बंद करण्यासाठी पॉवर बटण काही सेकंद दाबून ठेवा. नॉन-रिमूवेबल बॅटरी असलेल्या फोनमध्ये पाणी गेल्यास शॉर्ट सर्किटची शक्यता अधिक असते, त्यामुळे फोन लगेच बंद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यानंतर फोन आणि त्याचे सर्व भाग व्यवस्थित कोरडे करणे आवश्यक आहे. यासाठी पेपर नॅपकिन किंवा मऊ, कोरडा कापड वापरू शकता. फोनच्या बाहेरील भागासह चार्जिंग पोर्ट, स्पीकरजवळील भाग आणि इतर भागही काळजीपूर्वक पुसावेत.

Mobile Safety
तज्ज्ञांच्या मते, सिलिका जेल पॅक उपलब्ध असल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. हे छोटे पॅकेट्स अनेकदा शूज, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा पॅकेजिंग बॉक्समध्ये आढळतात. सिलिका जेल ओलावा शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे फोनमधील उरलेली आर्द्रता कमी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. (Mobile Safety)
फोन पूर्णपणे कोरडा होण्यासाठी पुरेसा वेळ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. साधारणपणे २४ तासांनंतर फोन पूर्णपणे सुकल्याची खात्री झाल्यावरच तो सुरू करावा. जर त्यानंतरही फोन सुरू होत नसेल किंवा काही तांत्रिक अडचणी जाणवत असतील, तर अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणी करून घेणे योग्य ठरेल.
याशिवाय काही चुका टाळणे आवश्यक आहे. अनेकजण फोन लवकर सुकावा म्हणून हेअर ड्रायरचा वापर करतात. मात्र गरम हवेचा परिणाम फोनच्या सर्किट्स आणि संवेदनशील भागांवर होऊ शकतो. त्यामुळे ड्रायर वापरणे टाळावे. (Mobile Safety)
तसेच फोन भिजल्यानंतर वारंवार बटणे दाबू नयेत. यामुळे पाणी आणखी आत जाऊ शकते. फोन पूर्णपणे कोरडा होईपर्यंत चार्जिंग पोर्ट, USB कनेक्शन किंवा हेडफोन जॅक वापरणेही टाळावे.
पावसाळ्यात थोडी काळजी आणि योग्य वेळी केलेली कृती तुमचा स्मार्टफोन मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते. त्यामुळे फोन भिजल्यास घाबरून न जाता शांतपणे योग्य पद्धतीने उपाय करणे गरजेचे आहे.




