Sangli Politics : सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवानंतर पडळकर यांनी थेट इशारा देत, “ज्यांनी-ज्यांनी जतचे अध्यक्षपद घालवले, त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार,” असे स्पष्ट केले. त्यांनी हा इशारा खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याकडे रोखला आहे. (Sangli Politics ) पडळकर यांनी पुढे बोलताना, “विशाल पाटील पुढे खासदार राहणार नाहीत. 2029 च्या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने उतरू आणि सर्वांचा हिशोब चुकता करू,” असा गर्भित इशाराही दिला. तसेच, सांगली जिल्ह्यात भविष्यात दोन लोकसभा मतदारसंघ होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी लोकसंख्या वाढ आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दाही उपस्थित केला. “2011 च्या जनगणनेनुसार मतदारसंख्या वाढत असून पुढे विधानसभा मतदारसंघांची संख्या देखील वाढू शकते,” असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या वर्धापनदिन मेळाव्यात पडळकर बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत, “2029 मध्ये सांगलीत भाजपचे खासदार निवडून आणायचेच,” असा निर्धार व्यक्त केला. पडळकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातील राजकारणात आगामी काळात चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Sangli Politics)