छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंच्या निवडीची सुखद वार्ता – जयंत पाटील

मुंबई – आज राज्यातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने महाविकास आघाडीच्या ५ तर भाजपच्या ४ उमेदवारांची विधान परिषद आमदार म्हणून निवड झाली आहे. विधान परिषदेच्या रिंगणामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी विशेष प्रयत्न झाले होते. अखेर उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याने राज्यातील संभाव्य राजकीय पेचप्रसंग टळला आहे.
मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेवर निवड झाल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी आनंद व्यक्त केला असून याबाबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषदेवरील निवडीबाबत जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून प्रतिक्रिया देताना, उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरील निवडीची सुवार्ता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी मिळाल्याने आनंद होतोय. असे ट्विट केले.
आपल्या ट्विटमध्ये पाटील यांनी, “आमदार म्हणून विधान परिषदेवर मा.@CMOMaharashtra
उद्धवजी ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी ही सुखद वार्ता मिळाली याबाबत आनंद होतोय. महाराष्ट्र सरकार रयतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार याचा मला विश्वास आहे.” असा संदेश दिला.





