Himachal pradesh : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी.! हिमाचलमध्ये आणखी 11 नवीन पर्यटन स्थळे विकसित होणार

Himachal pradesh – हिमाचलातील (Himachal pradesh) 11 नव्या निसर्गरम्य ठिकाणांना (11 new tourist spots) नवीन पर्यटन केंद्रे म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी दिली.
नुकतीच हिमाचल (Himachal pradesh) प्रदेश इको टुरिझम सोसायटीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यात त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर इको-टूरिझमला चालना देईल. त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील.
सरकारने निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या वनक्षेत्रातील 11 नवीन स्थळे शोधली असून तेथे ही नवीन पर्यटन स्थळे विकसित केली जातील. त्यात स्वार, सौरभ वन विहार, न्यूगल पार्क, पालमपूर वनविभागातील बीर-बिलिंग, पार्वती वनविभागातील कासोल, खीर गंगा,
सुमरूपा, कोटगढमधील नरकंडा आणि सिमला वनविभागातील पॉटर हिल कॅम्पिंग साइट, शोगी कॅम्पिंग साइट यांचा समावेश आहे. प्रत्येक इको-टुरिझम डेस्टिनेशन एक हेक्टर क्षेत्रात विकसित केले जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, निसर्गाने हिमाचलला अपार निसर्गसौंदर्य आणि वैभवाचे वरदान दिले असून जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले आहे. इको-टूरिझममुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल आणि उत्पन्नातही भर पडेल, असे ते म्हणाले.
याशिवाय राज्यात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. राज्यातील इतर ठिकाणची इको-टुरिझम स्थळेही ओळखून त्यांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास केला जाईल, असेही ते म्हणाले.





