बळीराजासाठी खुशखबर! यंदा देशात सामान्य मान्सून राहणार – स्कायमेटचा अंदाज

नवी दिल्ली – स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने यंदाचा मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के राहण्याचा अंदाज सांगण्यात आला असल्याने 2022 मध्ये पाऊसमान चांगले राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान सांगण्यात येणार आहे. दरम्यान, 2021 मध्येही सामान्य मान्सून राहणार असल्याचा अंदाज सांगण्यात आला होता. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटले जाते. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात पावसाळा असतो.
यंदा पावसाची चांगली सुरूवात होण्याचा अंदाज आहे. पहिल्या दोन महिन्यांमध्येच जमिनीतील पाण्याची पातळी सुधारेल. गेल्या वर्षी सुरूवातीला मरठावाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने ओढ दिली होती. यंदा मात्र, तसे होणार नसल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, 2021 मध्ये देशात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली पिके घेता आली होती. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचाही मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळाले. यंदाही चांगला पाऊस राहण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून सविस्तर अंदाज सांगण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या विभागात किती पाऊस राहणार हेही सांगितले जाणार आहे.





