Gold Silver Price Hike: सोने-चांदी पुन्हा सुसाट! तीन दिवसांच्या घसरणीनंतर किमतीत मोठी वाढ
Gold Silver Price Hike: मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ५ मार्च २०२६ च्या डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीच्या दरात संध्याकाळी अचानक तेजी दिसून आली.

Gold Silver Price Hike: गेल्या तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या प्रचंड घसरणीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना मंगळवारी मोठा दिलासा मिळाला. वायदा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार पुनरागमन करत मोठी झेप घेतली आहे. विशेषतः चांदीच्या दरात एकाच दिवसात ४० हजार रुपयांहून अधिक वाढ झाल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली असून, खरेदीदारांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य लोकांसाठी सोने चांदी खरेदी करणे अवघड होत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ५ मार्च २०२६ च्या डिलिव्हरीसाठी असलेल्या चांदीच्या दरात संध्याकाळी अचानक तेजी दिसून आली. काही तासांतच चांदीचे दर प्रति किलो ४० हजार रुपयांनी वधारले. चांदी २,७४,५५८ रुपये प्रति किलोवर व्यापार करत होती. दिवसभरात चांदीने २,७८,००० रुपयांचा उच्चांक गाठला, तर २,४५,७११ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. गेल्या सत्रात चांदी २,३६,२६१ रुपयांवर स्थिरावली होती, त्या तुलनेत आजची वाढ थक्क करणारी आहे.
४,२०,०४८ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक –
शुक्रवार ते सोमवार या कालावधीत चांदीच्या दरात तब्बल ४१ टक्क्यांची घसरण झाली होती. २९ जानेवारी रोजी चांदीने ४,२०,०४८ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर त्यात मोठी पडझड सुरू झाली होती. मात्र, मंगळवारच्या खरेदीने बाजार पुन्हा सावरला आहे. चांदीसोबतच सोन्याच्या दरातही मोठी सुधारणा पाहायला मिळाली. एप्रिल डिलिव्हरीचे सोने ७,९२३ रुपयांनी म्हणजेच ५.५ टक्क्यांनी वधारून १,५१,९१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. गेल्या तीन सत्रांत सोने सुमारे ४० हजार रुपयांनी स्वस्त झाले होते, परंतु आजच्या तेजीने गुंतवणूकदारांचे नुकसान काही प्रमाणात भरून काढले आहे.
बाजारातील या अनपेक्षित हालचालीवर भाष्य करताना तज्ज्ञांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांतील पडझडीनंतर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल वाढला आहे. सट्टेबाजांनी नवीन खरेदी सुरू केल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे ही दरवाढ झाली आहे. जागतिक स्तरावर न्यूयॉर्कच्या ‘कॉमेक्स’ बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत ६ ते १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या तेजीमुळे बाजार सावरला असला तरी, अद्याप मोठी अस्थिरता कायम असल्याने गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.





