Today Top 10 News: पुणे व बीडचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे; अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेणार sunetra pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केलेत. अजित पवारांकडील अर्थखाते वगळता इतर सर्व खाती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झालेय. ९ फेब्रुवारीपासून त्या मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात करणार आहेत. बारामती आणि बीडमधील जनतेशी असलेले अजित पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता, सुनेत्रा पवार विकासाची ही परंपरा कशी पुढे नेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेय. पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला pankaja munde राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज सकाळी उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे रवाना होणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टर हवेत झेप घेण्यापूर्वीच वैमानिकाला तांत्रिक अडचण जाणवल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने उड्डाण रद्द करण्यात आले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून, कार्यकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पर्यायी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. थोड्या विलंबाने का असेना, पंकजा मुंडे लातूर आणि सोलापूरमधील आपल्या नियोजित सभांना उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मोदींनी देश विकला – राहुल गांधी; अमेरिका-भारत व्यापार करारावरून टीका rahul gandhi लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरून गंभीर आरोप करत ‘देश विकल्याची’ टीका केली. अदानींवरील अमेरिकेतील खटला आणि एपस्टीन फाइल्सच्या दबावाखाली मोदींनी हे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी केले असून, भारत आता रशियाऐवजी अमेरिका व व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेय. यावर काँग्रेसने ‘मोगॅम्बो खुश झाला’ असा टोला लगावत ‘मेक इन इंडिया’च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. पंतप्रधानांनी मात्र या निर्णयाबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले असून याला ऐतिहासिक पाऊल म्हटलेय. काँग्रेसच्या 7 खासदार निलंबित; भारत-चीन वादावरून संसदेत गोंधळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भारत-चीन सीमावादावरून लोकसभेत गोंधळ पाहायला मिळाला. माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यादरम्यान कागद भिरकावण्यात झाल्याने पीठासन सभापतींनी काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदाराला संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले. निलंबित सदस्यांमध्ये मणिकम टागोर, अमरिंदर सिंह राजा वारिंग, किरण कुमार रेड्डी, हिबी ईडन, डीन कुरियाकोस, प्रशांत पडोले , एस वेंकटेशन यांचा समावेश आहे. शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी; गुंतवणूकदारांनी कमावले 12 लाख कोटी रुपये भारत-अमेरिका व्यापार कराराच्या सकारात्मक घोषणेमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात गेल्या आठ महिन्यांतील सर्वात मोठी तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा ‘सेंसेक्स’ २,०७३ अंकांच्या वाढीसह ८३,७३९ वर बंद झाला, तर ‘निफ्टी’ने २५,७२७ अंकांची पातळी ओलांडली. या ऐतिहासिक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात १२.०६ लाख कोटी रुपयांची भर पडली असून बीएसईचे एकूण बाजार भांडवल ४६७ लाख कोटींच्या पार गेलेय. अदानी पोर्ट्ससह प्रमुख शेअर्समध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली, तर क्षेत्रीय निर्देशांकांनीही जोरदार कामगिरी केली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील चौफेर खरेदीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते. ‘नियम पाळा अन्यथा गाशा गुंडाळा’; व्हॉट्सॲपला सुप्रीम कोर्टाचा सज्जड दम whats app and supreme court व्हॉट्सॲपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला चांगलेच फटकारलेय. “भारतात व्यवसाय करायचा असेल तर येथील नियमांचे पालन करावेच लागेल, अन्यथा तुम्ही देश सोडून जाऊ शकता,” अशा कडक शब्दांत न्यायालयाने मेटा कंपनीला सुनावले. भारतीय नागरिकांच्या खाजगी माहितीशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. व्हॉट्सॲपची धोरणे इतकी गुंतागुंतीची आहेत की ती सामान्य माणसाला समजत नाहीत आणि त्याचा गैरफायदा कंपनी घेत असल्याचे मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले. या प्रकरणी २१३ कोटी रुपयांचा दंड आधीच आकारण्यात आला असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन न्यायाधीशांचे विशेष खंडपीठ करणार आहे. फुफ्फुसांचा कर्करोग आणि डोळ्यांतील धोक्याचे संकेत; हा जगातील सर्वात प्राणघातक आजार जागतिक कर्करोग दिनानिमित्त समोर आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून, फुफ्फुसांचा कर्करोग हा जगातील सर्वात प्राणघातक आजार ठरतोय. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी सुमारे १८ लाख लोक या आजाराने आपला जीव गमावत आहेत. हा कर्करोग इतका आक्रमक आहे की तो स्तन आणि प्रोस्टेट कॅन्सरपेक्षाही अधिक वेगाने पसरतो. विशेष म्हणजे, डोळ्यांतील काही बदलांवरून या ‘सायलेंट किलर’ची ओळख पटू शकते. तज्ज्ञांच्या मते, डोळे पिवळे होणे, पापण्या खाली झुकणे (टोसिस), डोळ्यांखाली सूज येणे किंवा डोळे बाहुलीसह बाहेर आल्यासारखे दिसणे ही फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, कारण वेळेत निदान न झाल्यास हा कर्करोग हाडे आणि मेंदूपर्यंत पसरण्याची भीती असते. यामाहाची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; एका चार्जवर धावणार 169 किमी yamaha scooter प्रसिद्ध दुचाकी कंपनी यामाहाने भारतीय ग्राहकांसाठी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘EC-06’ अखेर लाँच केलीय. जर तुम्ही नवीन आणि स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या स्कूटरची सुरुवातीची किंमत १ लाख ६७ हजार रुपये एक्स-शोरूम आहे. ऑन रोड ही साधारण १ लाख ७२ हजार रुपयांपर्यंत येऊ शकते. ही स्कूटर सध्या फक्त यामाहाच्या शोरूममध्येच उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये मोठी ४kWh क्षमतेची बॅटरी दिलीय. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज व्हायला साधारण ८ तास लागतात. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर १६९ किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. टॉप स्पीड ७९ किमी प्रति तास इतका आहे. यामध्ये इको, स्टँडर्ड आणि पॉवर असे तीन पर्याय दिलेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार गाडीचा वेग आणि बॅटरीची बचत नियंत्रित करू शकता. सुरक्षेसाठी यामध्ये रिव्हर्स मोड आणि दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आलेत. रुचिताने करणला मारली चापट; बिग बॉसमध्ये पापड टास्कमध्ये राडा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी मिळवण्यासाठी जोरदार संघर्ष सुरूय. २४ व्या दिवशी सदस्यांना ‘पापड’ बनवण्याचे काम देण्यात आले होते, पण या टास्कमध्ये नियमांची पायमल्ली होऊन चक्क हाणामारी झाली. एकमेकांचे पीठ ओढताना आणि अंगावर पीठ फेकताना गोंधळ उडाला. याच दरम्यान करण सोनावणेने अंगावर पीठ टाकल्यामुळे चिडलेल्या रुचिता जामदारने त्याला जोरात चापट मारली. रुचिताने हात उगारताच करणचा पारा चढला आणि त्यानेही तिला मारण्यासाठी हात उचलला. इतर सदस्यांनी मध्ये पडून दोघांनाही रोखले. आर्या जाधवने निकीला मारल्यानंतर तिला घराबाहेर काढले होते, त्यामुळे आता रुचितावरही तशीच कारवाई होणार का, असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत. सोशल मीडियावर या प्रकरणावरून जोरदार चर्चा रंगली असून, घरात आता कोणाला शिक्षा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार; 250 दशलक्ष डॉलर्स नुकसानीची शक्यता Pakistan boycott India २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यावर संकटाचे ढग जमा झालेत. पाकिस्तान सरकारने आपल्या टीमला भारताविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिलाय. या निर्णयामुळे क्रिकेट विश्वाचे सुमारे २५० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जातेय. इतका मोठा आर्थिक फटका टाळण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत (PCB) तडजोड करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असले, तरी त्यांनी भारताविरुद्धच्या सामन्यावरच बहिष्कार टाकल्यामुळे आयसीसीची डोकेदुखी वाढलीय. जर हा सामना झाला नाही, तर स्पर्धेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होईल. आयसीसीने पाकिस्तानला या निर्णयाचे वाईट परिणाम होतील असा इशारा दिला असला, तरी सध्या वादापेक्षा संवादातून मार्ग काढण्यावर भर दिला जातोय. आता आयसीसी आणि पीसीबीमध्ये नेमका काय करार होतो, याकडे संपूर्ण क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेय. Rahul Gandhi: चीनचे रणगाडे 500 मीटर अंतरावर असताना दिल्लीत काय घडत होतं? राहुल गांधींच्या विधानावर संसदेत गदारोळ