सातारा – अतिक्रमणे हटवण्यासाठी गोडोलीकरांची ‘गांधीगिरी’

सातारा – गोडोलीतील साईबाबा मंदिर चौक चहूबाजूंनी हातगाडे, टपर्या, रस्त्यावरील पार्किंग व अन्य अतिक्रमणांनी वेढल्याने तेथे सतत वाहतूक कोंडी होत आहे. ही अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी गोडोलीतील नागरिकांनी दहा दिवसांपूर्वी पोलीस, बांधकाम विभाग आणि नगरपालिकेला निवेदन दिले होते. मात्र, या मागणीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या चौकातील अतिक्रमणे हटवण्यासाठी नागरिकांनी गांधीगिरी केली. रस्त्यावर उभे राहून, फलक झळकवत त्यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ही अतिक्रमणे जाईपर्यंत गांधीगिरी मार्गाने नियमित आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे यांनी सांगितले.
सातारा शहरात पूर्वेकडून येणार्या मुख्य रस्त्यावर गोडोली येथील साईबाबा चौकाला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, हातगाडे, टपर्यांची अतिक्रमणे आहेत. मात्र, त्यावर कारवाई केली जात नाही. पालिकेचा कर्मचारी या अतिक्रमणधारकांकडून रोज जागाभाडे पावत्या फाडतो. तो रोज प्रत्येक अतिक्रमणधारकाकडून दहा रुपये घेतो आणि कधीकधी पावत्या देतो. काही कर्मचारी टपर्या, हातगाडेधारकांकडून हप्ते घेतात. वाहतूक पोलीस या चौकात वाहतूक नियमनापेक्षा वाहनधारकांची कागदपत्रे तपासत ‘वरकमाई’ करताना दिसतात. या चौकातील अतिक्रमणे संबंधित विभागांच्या अधिकारी, कर्मचार्यांसाठी वरकमाईचा राजमार्ग बनला आहे, असा आरोप नागरिकांनी केला.
या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्याचा नाहक त्रास सर्वांनाच होत असतानाही त्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या तिन्ही विभागांच्या काभारावर संशय व्यक्त केला जात आहे. या बाबी निदर्शनास आणून दिल्या, तरीही कारवाई होत नसल्याने, गोडोलीतील नागरिकांनी शुक्रवार (दि. 19) पासून चौकात, प्रबोधन करणारे फलक घेऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. अतिक्रमणे हटवेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे अजय पार्टे व हृषीकेश भोसले यांनी सांगितले.





