Alibaug News : गोव्याची खास सर्व्हिस आता अलिबागमध्ये होणार सुरू ? पर्यटकांची मज्जाचं मज्जा!

Alibaug News : अलिबागच्या रम्य समुद्रकिनाऱ्यांवर आता पर्यटकांना गोव्यासारखा थरारक अनुभव घेता येणार आहे. गोव्यात बाईक किंवा स्कूटीवर फिरण्याचा आनंद लुटणारे पर्यटक आता अलिबागमध्येही असाच अनुभव घेऊ शकतील. राज्य परिवहन प्राधिकरणाने अलिबागमध्ये बाईक रेंटल सेवेला अधिकृत परवाना देऊन पर्यटकांसाठी हा अनुभव अधिक सोपा आणि सुरक्षित केला आहे.
अधिकृत बाईक रेंटल सेवेला हिरवा कंदील
ऑगस्ट २०२५ मध्ये, राज्य परिवहन प्राधिकरणाने ‘रेंट ए मोटारसायकल स्कीम १९९७’ अंतर्गत दोन ऑपरेटर कंपन्यांना बाईक रेंटल सेवा सुरू करण्यासाठी परवाने दिले आहेत. हा परवाना पाच वर्षांसाठी वैध असून, त्याचे वार्षिक शुल्क फक्त १,००० रुपये आहे. या योजनेनुसार, पर्यटक आणि स्थानिकांना तास किंवा दिवसाच्या आधारावर बाईक आणि स्कूटी भाड्याने घेता येणार आहे. परवानाधारक ऑपरेटर सर्व सरकारी नियम आणि सुरक्षा मानकांचे पालन करतील, याची खात्री परिवहन विभागाकडून केली जाईल.
पर्यटनाला चालना, स्थानिकांना रोजगार
ही सेवा अलिबागच्या पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणार आहे. बाईक रेंटलमुळे पर्यटकांना अलिबागचे निसर्गरम्य किनारे, किल्ले आणि पर्यटनस्थळे फिरणे अधिक सुलभ होईल. यासोबतच, स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. यापूर्वी काही हॉटेल्स आणि व्यक्तींकडून बेकायदेशीरपणे बाईक भाड्याने देण्याचे प्रकार समोर येत होते. आता मात्र, अधिकृत परवानाधारक ऑपरेटरकडून सुरक्षित आणि कायदेशीर सेवा उपलब्ध होईल.
पर्यटकांमध्ये उत्साह
अलिबागला भेट देणारे पर्यटक या नव्या सेवेमुळे उत्साहित आहेत. गोव्यासारखा बाईकवर फिरण्याचा अनुभव आता अलिबागमध्येही मिळणार असल्याने, येथील पर्यटनाला आणखी बळ मिळेल. ही सेवा सुरू झाल्याने अलिबागचा निसर्ग, समुद्रकिनारे आणि ग्रामीण सौंदर्य अनुभवण्याचा आनंद द्विगुणित होणार आहे.




