Goa Short Film Festival : पुण्यात 25 ऑक्टोबरला गोवा लघुपट महोत्सव
Goa Short Film Festival : पुण्यात २५ ऑक्टोबरला १३ वा गोवा लघुपट महोत्सव होणार आहे. विविध देशांतील १०० हून अधिक लघुपट दाखविण्यात येणार असून महोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे.

Goa Short Film Festival : नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या गोवा लघुपट महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष आहे. हा महोत्सव २५ ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
सारसबागेजवळील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील सभागृहात सकाळी १० वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विविध देशांतील १०० हून अधिक लघुपट दाखविण्यात येणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.
महोत्सवातील विविध विभागांतील विजेत्यांना ज्येष्ठ लेखक व संगीत समीक्षक सुभाषचंद्र जाधव, लेखक विनायक कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक कल्पना खरे, ज्येष्ठ लेखक दिलीप कुकडे आणि मनोहर सप्रे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता यांसह ३५ विभागांत पारितोषिके दिली जाणार आहेत. महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या लघुपटांच्या निर्माते आणि दिग्दर्शकांना प्रशस्तीपत्रकही देण्यात येणार आहे.
विविध लघुपटांचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी संवाद, चर्चासत्रे आणि अन्य कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आले आहेत.





