Samira Reddy : गोवा बनलं समीरा रेड्डीचं मानसिक आरोग्य सुधारण्याचं कारण, अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत

Samira Reddy : बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिनं गोव्यात शिफ्ट झाल्यानंतर आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. 2020 मध्ये आपल्या कुटुंबासह गोव्यात स्थायिक झाल्यानंतर, तिला मानसिक शांतता आणि स्थैर्य मिळालं असल्याचं ती म्हणते.
समीराच्या म्हणण्यानुसार, गोवा या शहराने तिला एक शांत, समाधानी व्यक्ती आणि एक चांगली आई बनवण्यास मदत केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना समीराने लिहिलं की, “गोव्यातील आमचा सहावा वर्ष सुरू आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही की या शहराने मला व्यक्ती म्हणून किती बदलवलं आहे, विशेषतः माझ्या मानसिक आरोग्यावर याचा खूप चांगला परिणाम झाला आहे.”
ती पुढे म्हणाली, “मी आता एक अशी आई आहे जिला आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदाला प्राधान्य द्यावं वाटतं. मी आता कोणतीही गोष्ट फक्त अपेक्षांपोटी करत नाही, तर ती गोष्ट माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी करते.”
समीरा म्हणते की, गोवा हे शहर केवळ निसर्गसंपन्न नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत अनुकूल आहे. “खूप लोक विचारतात की मी गोवा का निवडलं? त्यामुळे मी लवकरच माझा अनुभव सांगणारी एक सिरीज सोशल मीडियावर शेअर करणार आहे,” असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.
‘गोवा’ आणि ‘मॉम लाइफ’ या हॅशटॅग्सचा वापर करत तिनं स्पष्ट केलं की, गोवा हे केवळ तिच्या आरोग्यासाठी नव्हे, तर तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी फायदेशीर ठरलं आहे. विशेषतः तिच्या मुलांना एक सकारात्मक आणि आनंदी वातावरण मिळाल्याचं तिनं सांगितलं.
समीरा रेड्डीसारखी लोकप्रिय अभिनेत्री जेव्हा स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल इतक्या स्पष्टपणे बोलते, तेव्हा ती इतरांनाही प्रेरणा देते. गोवा हे शहर आता तिच्यासाठी केवळ एक राहण्याचं ठिकाण नाही, तर मानसिक शांततेचं आणि कुटुंबाच्या आनंदाचं केंद्र ठरलं आहे.





