Highest Partnership In Ranji Trophy (GOA vs ARP) : एकीकडे टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना दुसरीकडे भारतात देशातंर्गत रणजी ट्रॉफी खेळवली जात आहे. जिथे आज दोन फलंदाजांनी कहर केला आहे. अरुणाचल प्रदेश आणि गोवा यांच्यात झालेल्या सामन्यात गोव्याच्या दोन फलंदाजांची स्फोटक कामगिरी पाहायला मिळाली. गोव्याच्या दोन्ही फलंदाजांनी एकाच डावात नाबाद त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. इतकेच नव्हे तर या सामन्यात दोघांनी रणजी इतिहासातील सर्वात मोठी भागीदारीही रचण्याचा पराक्रम देखील केला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये गोवा आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात गोव्याच्या कश्यप बाकले (Kashyap Bakle) आणि स्नेहल कौठणकर (Snehal Kauthankar) या दोघांनीही नाबाद त्रिशतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच डावात दोन फलंदाजांनी त्रिशतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
🚨 Record Alert
Goa batters Kashyap Bakle (300*) & Snehal Kauthankar (314*) have registered the highest-ever partnership in #RanjiTrophy history!
An unbeaten 606 runs for the 3rd wicket in the Plate Group match against Arunachal Pradesh 👏
Scorecard: https://t.co/7pktwKbVeW pic.twitter.com/9vk4U3Aknk
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 14, 2024
गोव्याने 121 धावांत दोन विकेट (इशान गाडेकर 03 आणि सुयश प्रभुदेसाई 73) गमावल्या होत्या. यानंतर क्रीझवर फलंदाजीला आलेल्या कश्यप आणि कौठणकर यांनी विरोधी गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. कश्यपने 269 चेंडूत 300 धावांची नाबाद खेळी खेळली. ज्यामध्ये त्याने 39 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय स्नेहल कौठणकरनेही त्याला साथ देत 215 चेंडूत 45 चौकार अन् 4 षटकारासह 314 धावांची नाबाद खेळी केली.
या सामन्यात गोव्याने आपला डाव 2 बाद 727 धावांवर घोषित केला आहे. ज्यामध्ये कश्यप आणि कौठणकर यांच्यात विक्रमी 606 धावांची भागीदारी झाली. जी रणजी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी रणजीमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे यांच्या नावावर होता. या दोघांनी 2016 मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी 594 धावांची भागीदारी केली होती. याव्यतिरिक्त कश्यप आणि कौठणकर हे गोव्याचे गोव्याचे फलंदाज प्रथम श्रेणी क्रिकेटमधील श्रीलंकेचे माजी फलंदाज महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचा विक्रम मोडू शकले नाहीत. ज्यानी 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 624 धावांची भागीदारी केली होती.
गोव्याचा एक डाव अन् 551 धावांनी विजय…
तत्पूर्वी, अरुणाचल प्रदेशचा संघ पहिल्या डावात केवळ 84 धावांत गारद झाला होता. पहिल्या डावात गोव्याकडून अर्जुन तेंडुलकरची चमक पाहायला मिळाली. अर्जुनने गोलंदाजी करताना 5 बळी घेतले. पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या अरुणाचल प्रदेश संघाचा डाव अर्जुन तेंडुलकरच्या भेदक गोलंदाजीसमोर 30.3 षटकांत 84 धावांवर मर्यादित राहिला. अर्जुन तेंडुलकरने रणजी स्पर्धेत प्रथमच 5 बळींची नोंद केली. अर्जुनने नीलम ओबी (22) आणि चिन्मय पाटील (03), नबाम हाचांग (०), जय भावसार (०) व मोजी इटे (01) या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. त्याला मोहित रेडकरने 15 धावांच्या मोबदल्यात 3 तर कीथ मार्क पिंटोने 31 धावांमध्ये 2गडी बाद करताना सुरेख साथ दिली. अरुणाचल प्रदेशकडून कर्णधार नबाम अबोने सर्वाधिक 25 धावा केल्या.
Goa Won by an innings and 551 Run(s) #GOAvARP #RanjiTrophy #Plate Scorecard:https://t.co/XFSOXuuFHq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 14, 2024
प्रत्युत्तरात गोव्याने आपला डाव 2 बाद 727 धावांवर घोषित केला. त्यानंतर अरुणाचल प्रदेश आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करतील अशी आशा होती. मात्र, त्यांचे फलंदाज दुसऱ्या डावातही अपयशी ठरले अन् पहिल्या डावाची पुनरावृत्ती परत पहायला मिळाली. अरुणाचल प्रदेशचा दुसरा डावही 22.3 षटकात 92 धावांवर आटोपला. यादरम्यान त्याचे तीनच फलंदाज (नबाम तगन अबो 31, नबाम हाचांग 24, याब निया 14) दुहेरी आकडा गाठू शकले. चिन्मय पाटील हा दुखापतीमुळे खेळू (absent hurt) शकला नाही. गोव्याकडून लक्ष्य गर्गनं सर्वाधिक 4 तर दीपराज गावकर आणि कीथ मार्क पिंटो यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.