IND vs SA 3rd T20 : भारताने तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने निर्धारित षटकांत 219 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावाच करू शकला.
अशाप्रकारे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 11 धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी, या विजयानंतर भारतीय संघानं 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. या विजयानंतर टीम इंडियाचे लक्ष आता चौथ्या आणि अंतिम सामन्यावर असेल. शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे हा सामना होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने 17 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली, पण तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय हेनरिक क्लासेनने 22 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. भारताच्या 219 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का 27 धावांवर बसला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिक्लेटन 15 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर, रीझा हेन्रिक्सने 13 चेंडूत 21 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने 18 चेंडूत 29 धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्स 12 चेंडूत 12 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. यानंतर हेनरिक क्लासेनने 22 चेंडूत 41 धावा केल्या. हेनरिक क्लासेनला अर्शदीप सिंगने बाद केले. भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे तर अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 37 धावांत 3 फलंदाज बाद केले. वरुण चक्रवर्तीला 2 यश मिळाले. याशिवाय हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर भारताने तिलक वर्माचे तूफानी शतक आणि अभिषेक शर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 219 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. भारतासाठी, तिलक वर्मा याने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, ज्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला.
𝙄𝙣𝙣𝙞𝙣𝙜𝙨 𝘽𝙧𝙚𝙖𝙠!
A power-packed unbeaten TON from Tilak Varma 💪
A quickfire half-century from Abhishek Sharma ⚡️#TeamIndia post 219/6 on the board 👏Over to our bowlers now 👍
Scorecard ▶️ https://t.co/JBwOUCgZx8 #SAvIND | @TilakV9 | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/iUNnLLs9w0
— BCCI (@BCCI) November 13, 2024
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीच्या षटकातच संजू सॅमसनची विकेट गमावली. सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात खातेही न उघडता बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक आणि तिलक यांनी डावाची धुरा सांभाळली आणि दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक बाद झाला. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने 25 चेंडूत 50 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 5 षटकार मारले. अभिषेक बाद झाल्यानंतर तिलकने आपली खेळी सुरू ठेवत आधी अर्धशतक केले आणि नंतर शतक झळकावण्यातही यश मिळवले.
तिलक 56 चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 107 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने एका धावेचे, हार्दिक पंड्याने 18 धावांचे, रिंकू सिंगने आठ धावांचे आणि रमणदीप सिंगने 15 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी अक्षर पटेल एक धाव काढून नाबाद परतला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अँडिले सिमेलेने आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय मार्को जॅनसेनला 1 यश मिळाले. तर जेराल्ड कोएत्झी, लुथो सिम्पाला आणि कर्णधार एडन मार्कहॅम यांना यश मिळाले नाही.