गो, गो, गो गोविंदा.! राज्यात दहीहंडीचा उत्साह; ‘या’ मंडळांनी ठेवलं सर्वात मोठं बक्षिस, आकडा ऐकून व्हाल हैराण !

Dahi Handi 2024: कृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. याच काळात भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला म्हणून हा सण दोन दिवसांचा मानला जातो.
यावेळी श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. मात्र कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीची धाम-धूम चालू असून, पुणे, मुंबई आणि ठाणे या महत्वाच्या शहरांमध्ये दहीहंडीसाठी तर लाखोंचे बक्षिस ठेवण्यात आले आहे.
ठाणे शहरात प्रताप सरनाईक आयोजित संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. जे पथक दहीहंडी फोडेल त्यांना 11 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मनसेकडूनही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी स्वतः राज ठाकरे देखील संध्याकाळी 6 वाजता या दहीहंडीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 11 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे.
ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानकडूनही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
तर कॅसनमील चौकात भाजपच्या कृष्णा पाटील यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही दहीहंडी फोडणाऱ्यांना एकूण 55 लाखांची बक्षीसं दिली जाणार आहेत. पुणे शहरात देखील भव्य दहीहंडी उभारण्यात आली असून, अनेक मंडळांनी मोठं-मोठी बक्षिसे ठेवली आहेत.





