Karnataka : ‘जानवे आणि हातातील पवित्र धागा काढा…’; कर्नाटकात परीक्षेदरम्यान वादग्रस्त घटना

Karnataka – कर्नाटकातील शिवमोग्गा येथे सीईटी म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट दरम्यान काही विद्यार्थ्यांना जानवे आणि त्यांच्या हातावर बांधलेला पवित्र धागा काढण्यास सांगण्यात आले. शिवमोग्गा येथील आदि चुंचुंगिरी पीयू कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. आता यावरुन वाद निर्माण झाला आहे.
गेटवर उपस्थित असलेल्या रक्षकांनी दोन विद्यार्थ्यांना जानवे आणि संरक्षक धागा काढायला लावला. परंतु तिसरा विद्यार्थी जानवे न काढण्यावर ठाम होता. ही घटना १६ एप्रिल रोजी घडली. त्या विद्यार्थ्याला सुमारे १५ मिनिटे गेटवर थांबवण्यात आले. अ
खेर रक्षकांनी त्याच्या हातातील संरक्षक धागा काढला, परंतु त्याला जानव्यासह परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. ही माहिती हळूहळू संपूर्ण परिसरात पसरली आणि आता हे प्रकरण गंभीर बनले आहे.
अखिल कर्नाटक ब्राह्मण सभेने जिल्हा दंडाधिकाऱ्यांची (डीएम) भेट घेतली आणि कठोर कारवाईची मागणी केली. धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि दोषींवर त्वरित कारवाई करावी, असा आरोप त्यांनी केला.
कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर म्हणाले की, असे घडायला नको होते. जर हे घडले असेल आणि दावा केल्याप्रमाणे असेल, तर ते निषेधार्ह आहे. मी कार्यकारी संचालकांकडून अहवाल मागितला आहे.
परीक्षांसाठी काही निश्चित प्रोटोकॉल आहेत, जे प्रत्येक संस्था पाळते परंतु त्यात जानवे काढून टाकण्याचा कोणताही उल्लेख नाही. जर तपासात हे खरे ठरले तर विभाग दोषी लोकांवर कारवाई करेल.





