Irfan Pathan : ‘आम्हाला जणू मेल्यासारखं वाटतं होतं…’, इरफान पठाणने सांगितला टीम इंडियाचा सर्वात वाईट काळ

Irfan Pathan recalls India heart breaking exit : एकदिवसीय विश्वचषक 2007 हा भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वात वाईट काळ मानला जातो. या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला. विशेषतः बांगलादेशविरुद्धच्या पराभवाने संघाला मोठा धक्का बसला होता. या पराभवानंतर खेळाडूंवर तीव्र टीका झाली, तसेच काही खेळाडूंच्या घरांवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. या कठीण काळाला मागे वळून पाहताना माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने मोठा खुलासा केला आहे.
2007 च्या विश्वचषकात भारताचा दारुण पराभव –
एकदिवसीय विश्वचषक 2003 च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारा भारतीय संघाने 2007 मध्ये मात्र अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. बांगलादेश आणि श्रीलंकेकडून झालेल्या पराभवांमुळे भारतीय संघ साखळी फेरीतूनच बाहेर झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर खेळाडूंना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. हा काळ आठवताना इरफान पठाणने ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “आम्ही दोन दिवस हॉटेलमध्ये होतो, तेव्हा आम्हाला जणू मेल्यासारखं वाटतं होतं. प्रत्येकालाच तसंच वाटतं होतं.” हा विश्वचषक पठाणचा खेळाडू म्हणून पहिला एकदिवसीय विश्वचषक होता, जिथे त्याचीही कामगिरी निराशाजनक राहिली.
काही महिन्यांनंतर टी-20 विश्वचषकात मारली बाजी –
एकदिवसीय विश्वचषक 2007 च्या पराभवानंतर अवघ्या काही महिन्यांनी भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2007 मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेत इरफान पठाणने उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकून एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाची भरपाई केली. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात पठाणला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतर पठाण आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. मात्र, याच स्पष्टवक्तेपणामुळे अलीकडेच त्याला समालोचनातूनही हटवण्यात आले होते.
इरफान पठाणचे माजी पंच स्टीव्ह बकनरबद्दल मोठं वक्तव्य –
मुलाखतीत इरफान पठाणने माजी पंच स्टीव्ह बकनरबद्दल मोठे विधान केले. त्यानी म्हटले की बकनर खूप वाईट पंच होते आणि त्यांनी सचिन तेंडुलकरला अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिले. एक किस्सा सांगताना इरफान म्हणाला की, सचिन पाजी ईडन गार्डन्समध्ये बॅकफूट शॉट खेळत होते. चेंडू बॅटपासून दूर होता, पण बकनरने त्यांना बाद दिले. पाजी फक्त हसले आणि पॅव्हेलियनमध्ये परतले. स्टीव्ह बकनरने १२८ कसोटी आणि १८२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले, परंतु त्यांचे काही निर्णय अजूनही वादग्रस्त मानले जातात.





