Satara | प्रकल्पग्रस्तांना जमिनी पसंतीसाठी वाढीव कालावधी द्या

बामणोली, (प्रतिनिधी) – कोयना धरण होवून 60 वर्षे झाली तरी बाधित धरणग्रस्तांना शासनाने आजअखेर कोणताही मोबादला दिलेला नाही. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम सुरु केल्याने आता जमिनी पसंदीसाठी खुल्या केल्या आहेत.
मात्र, खातेदार जास्त असल्याने त्याचा कालावधी वाढीव द्यावा, अशी मागणी कोयना धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळुंखे यांनी केली.
डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कोयना धरणग्रस्तांची बामणोली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जावली व महाबळेश्वर तालुक्यातील कोयना धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश साळुंखे म्हणाले, शासनाने कोयनेच्या बाधित प्रकल्पग्रस्तांना माण व खटाव या तालुक्यात शिल्लक असलेल्या जमिनी पसंद करण्यासाठी खुल्या केल्या आहेत. मात्र, या जमिनी पसंतीसाठी फक्त दोन दिवस देण्यात आलेला होते.
परंतु, खातेदार जास्त असल्याने पसंतीसाठी कमीत कमी 4 ते 5 दिवसांच्या वाढीव तारखा देण्यात याव्यात. तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांना दिलेल्या दिवशी उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना देखील करण्यात याव्यात.
यावेळी बैठकीत पुढील जमीन पसंतीसाठीची रूपरेषा ठरवण्यात आली. तसेच कालावधी वाढवण्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकार्यांना लेखी पत्र देण्याचा निर्णयही कोयना धरणग्रस्त संघटनेने यावेळी घेतला.




