Satara | कास पठार ते कास धरण रस्ता पाण्याखाली

बामणोली, {देवेंद्र साळुंखे} – काससह बामणोली परिसरात सध्या पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दैना झाली असून यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
यातच कास पठार ते कास धरण रस्ता पाण्याखाली गेला असल्याने त्यासाठी सातारा नगरपालिकेने तयार केलेला नवीन कच्चा पर्यायी रस्ताही पाणी साचून खचला असल्याने वाहने मोठी वाहने अडकत आहेत. अडकलेली वाहने काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कास बामणोली परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्ठीमुळे कास व बामणोली परिसरामध्ये रस्त्यालगत दरडी कोसळत आहे, साईट पट्टया खचल्या आहेत, कास बामणोली रस्त्याला काही ठिकाणी रस्त्यामध्ये झाडे पडलेली आहेत. त्याच प्रमाणे काही ठिकाणी रस्ते ही खचले आहेत.
अशा मध्ये कास धरणाची उंची वाढवल्यामुळे कास पठार ते कास धरण रस्ता पाण्याखाली गेला आहे. स्थानिक व पर्यटकांच्या गाड्यांसाठी सातारा नगरपालिकेने कास पठार रस्ता (बंगला) ते कास धरण असा पर्यायी नवीन कच्चा रस्ता तयार केला आहे. परंतु, सातारा नगरपालिकेने केलेला नवीन रस्ता खचला आहे. त्यातच रस्त्यामध्ये टाकलेली गटाराची पाइप छोटी असल्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी सरळ डांबर रस्त्यावर येत आहे.
यामुळे डांबरी रस्त्याच्या सुरूवातीला पाणी साचून रस्ता खचला असल्यामुळे स्थानिकांच्या व पर्यटकांची वाहने खचलेल्या रस्त्यामध्ये अडकली. यावेळी प्रसंगावधान दाखवून कास पठार समितीच्या कर्मच्यार्यांच्या व स्थानिकांच्या मदतीने अडकलेली वाहने काढण्यात आली. मात्र, भर पावसात सर्वांनाच कसरत करावी लागली. पावसात भिजत स्थानिकांसह पर्यटकांना वाहने बाहेर काढावी लागली याचा मोठा त्रास झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
पावसाळी पर्यटनावर परिणाम
सातारा नगर पालिकेने नवीन तयार केलेला रस्ता हा खचल्यामुळे स्थानिकांना व पर्यटकांना घाटाईमार्गे बामणोलीला वाढीव अंतराने प्रवास करावा लागत आहे. तसेच कास व परिसरामध्ये धबधबे असल्यामुळे सातारा व परिसरातील पर्यटक पावसामध्ये भिजण्यासाठी व कास पठारावरील धुक्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी कास पठार ते बामणोलीकडे गर्दी करत असतात. परंतु कास येथील खराब रस्त्यामुळे वाढीव वाहतुकीमुळे कास व बामणोली येथील पर्यटन स्थळांना पर्यटक पाठ फिरवताना दिसून येत आहे.
रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
बामणोली म्हटले की रस्ते खराबच, असेच या भागाकडे येणारे पर्यटक बोलत असतात. दरवर्षी रस्त्यांची अशीच दुरवस्था होते. परंतु अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. दररोज आम्हाला याच रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. आता तर कास येथील रस्ता खचला असल्यामुळे आता आम्हाला घाटाई मार्गे 7 ते 8 किमी अंतरावरून प्रवास करावा लागतो.
आम्ही साताराला जात असताना 3 ते 4 गाडया चिखलामध्ये फसल्या होत्या. त्या आम्ही त्या गाडया स्थानिकांच्या मदतीने गाडया बाहेर काढल्या. सातारा नगर पालिकेने कास पठार ते धरण रस्ता तात्काळ दुरूस्त करावा. गणेश पवार, वाहनचालक, पावशेवाडी





