पुणे | तक्रार द्या तीन दिवसात खड्डे बुजविणार

पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील प्रमुख जिल्हा, राज्य महामार्गांवर असणाऱ्या खड्डयांसंदर्भात तक्रार करण्यासाठी पॉटहोल कंप्लेंट रिद्रेड्रेसल सिस्टीम (पीसीआरएस) हे ॲपवरील तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आला आहे.
नागरिकांना पीसीआरएस या अॅपवर खड्यांची तक्रार नोंदविता येणार आहे. या तक्रारीची दखल घेऊन तीन दिवसात खड्डे बुजविण्यात येणार असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.
गुगल प्ले स्टोअर वरून नागरिकांना पीसीआरएस या अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. पीडब्ल्यूडीने महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरच्या (एमआरएसएसी) सहाय्याने पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येणारे एक लाख १८ हजार कि.मी. पेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे तयार करून त्याचा या अॅपमध्ये समावेश केला आहे.
तक्रारदाराला जीपीएस लोकेशन सुरू ठेऊन केवळ महामार्गावरील खड्ड्यांचे दोन छायाचित्र टाकल्यानंतर संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंता, कार्यकारी उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांच्या मोबाईलमधील अॅपमध्ये दिसणार आहे.
याबाबत संबंधित तक्रारदाराला देखील एसएमएस प्राप्त होईल. पुढील ३ दिवसांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करून तक्रादाराच्या तक्रारीचे निराकरण केले असल्याचे छायाचित्रासहीत माहिती देण्यात येईल, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
मोबाईल ॲप स्टोअरमध्ये पीसीआरएस ॲप डाऊनलोड करावे, जीपीएस सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. लॉगईन प्रक्रिया पूर्णझाल्यानंतर तक्रार करण्यासाठी दोन छायाचित्र आणि ठिकाणाचा मजकूर टाकावा लागणार आहे. पीडब्ल्यूडीच्या रस्त्याची तक्रार आहे किंवा नाही याची खात्री करून तक्रारदाराला नंबर आणि एसएमएसद्वारे माहिती प्राप्त होणार आहे.
प्रादेशिक विभागानुसार कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना ३ दिवसांच्या आत खड्डे भरावे लागणार आहे. जर ३० दिवसांच्या आत तक्रार निवारण झाले नाही, तर पुनर्विलोकन करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.





