पुणे जिल्हा | सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – शिरगाव-मंदोशीमार्गे तळेघर रस्त्या खड्डे आणि साइडपट्ट्या न भरल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या वर्दळीच्या रस्त्याकडे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या हलगर्जीपणाचा बुधवारी (दि. 17) पहिला बळी गेला आहे. मोरोशी येथील आदिवासी युवकाचा मंदोशीत झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
राजगुरूनगर-वाडामार्गे भीमाशंकर हा मंदोशी तळेघरवरून जाणारा राष्ट्रीय मार्ग आहे. नुकताच या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे.या रस्त्यावरून भीमाशंकर आणि आंबेगाव तालुक्यात मोठा वापर केला जातो.
भीमाशंकरकडे जाणार्या या रस्त्यावर खड्डे आणि अरुंद वळणे त्यातच साइडपट्ट्या वाहून गेल्याने दोन वाहनांना पुढे मागे जाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यावर मंदोशी घाट आणि वेडीवाकडी वळणे असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने बुधवारी (दि. 17) मंदोशी गावाजवळ दुचाकी व टेम्पोच्या भीषण अपघात झाला यात मोरोशी येथील आदिवासी युवक देविदास मारुती भांगे (वय 25) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला टेम्पोचालकासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.
वेळीच या रस्त्याच्या साईडपट्टया भरल्या असत्या तर देविदास भांगे याचा अपघाती मृत्यू झाला नसता मात्र बेफिकीर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे आणि बेफिकीरीने एका युवकाला जीव गमवावा लागला आहे.





