Alephata : पोरींनो, आई-बाप कळले आहेत का? – प्रा. वसंत हंकारे
Alephata : विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी विवेक, संस्कार आणि कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाची जोड द्यावी, असा संदेश प्रा. हंकारे यांनी दिला.

आळेफाटा : एक चुकीची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आणि तुमच्या आयुष्याचे वाटोळे करून जाते पोरींनो, तुम्हाला आई-बाप कळले आहेत का? अशा परखड शब्दांत प्राध्यापक वसंत हंकारे यांनी आळे येथे विद्यार्थी आणि पालकांना आत्मपरीक्षणाचा सवाल केला. त्यांच्या रोखठोक आणि वास्तववादी शैलीतील वक्तव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
ज्ञानमंदिर हायस्कूल आणि बी. जे. महाविद्यालयाच्या वतीने आळे येथे एका मंगल कार्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रा. वसंत हंकारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, संस्कार, आई-वडिलांचे महत्त्व, चुकीची संगत आणि जीवनातील निर्णय या विषयांवर प्रबोधन केले.
विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी विवेक, संस्कार आणि कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाची जोड द्यावी, असा संदेश प्रा. हंकारे यांनी दिला. तरुण वयात घेतलेले चुकीचे निर्णय भविष्यातील आयुष्यावर दूरगामी परिणाम करू शकतात. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग आणि दाखवलेला विश्वास यांची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हंकारे यांच्या मिश्कील, विनोदी आणि त्याचवेळी परखड शैलीमुळे सभागृहात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना केवळ उपदेश न करता त्यांच्या भाषेत संवाद साधून वास्तवाचे भान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चुकीची संगत टाळणे, स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणे आणि पालकांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व समजून घेणे, हे त्यांच्या व्याख्यानाचे प्रमुख मुद्दे ठरले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कुर्हाडे, प्रसन्न डोके, माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम गुंजाळ, संस्थेचे अध्यक्ष अजय नाना कुर्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, संचालक मंडळातील सदस्य, प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव, उपप्राचार्य डॉ. संजय वाकचोरे, गावातील विविध पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष अजय नाना कुर्हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवा!
तरुण वयात आकर्षणापोटी किंवा चुकीच्या संगतीमुळे घेतलेला एखादा निर्णय संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणींची निवड करताना विवेक वापरावा, आई-वडिलांचा विश्वास जपावा आणि शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करावेत, असा संदेश प्रा. वसंत हंकारे यांनी दिला.





