Ajit Pawar : गिरीश आता तरी सुधार…; अजित पवारांचा विधानसभेत गिरीश महाजनांना टोला

मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यावेळी भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणादरम्यान भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत रोहित पवारांनी 1100 मतांनी विजय मिळवला. यानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये सभा घेतली नाही, असा हल्लाबोल केला होता. यावरून अजित पवारांनी आज वक्तव्य केले.
राम शिंदे सर तुम्ही बोलताना म्हणाला होतात अजित पवारांनी माझ्या येथे सभा घेतली नाही. त्यामुळे आपला पराभव झाला, असे आपण बोलले होतात. मात्र जे झाले ते चांगले झाले अन आपण सभापती झालात. तुम्ही जर निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असे वाटले असते तर गिरीश महाजनांचे मंत्रिपद गेले असते. गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, असे म्हणत अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला आणि सभागृहात एकच हशा पिकला.





