ITI Admission – राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, प्रवेश पूर्णपणे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. २१ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रवेशाची माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. यंदा ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक शासकीय व खासगी आयटीआयमध्ये २१ मे पासून दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून त्याच ठिकाणी शुल्क भरावयाचे आहे. राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये, अराखीव प्रवर्गासाठी १५० रुपये, तर राज्याबाहेरील उमेदवारांसाठी ३०० रुपये शुल्क निश्चित केले आहे. अर्ज भरल्यानंतर तो जवळच्या कोणत्याही आयटीआयमध्ये जाऊन कागदपत्रांच्या पडताळणीसह कन्फर्म करावा, तसे न केल्यास प्रवेश फेऱ्यांसाठी विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची सुविधा १ जूनपासून सुरू होईल. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपला पासवर्ड गोपनीय ठेवावा आणि एकापेक्षा जास्त अर्ज भरू नयेत. खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित ट्रेड शासनमान्य आणि एनसीव्हीटीशी संलग्न असल्याची खात्री करावी व तांत्रिक अडचणींसाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरील मदत कक्षाच्या क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.