Ghod River Flood: शिरूर तालुक्यात घोडनदीचे रौद्ररूप! नदीकाठची पिके पाण्यात; २० हजार क्यूसेकने विसर्ग सुरू
Ghod River Flood: कुकडी प्रकल्पातील डिंभे, वडज आणि येडगाव धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग; घोडनदी दुथडी भरून वाहू लागली.

Ghod River Flood – कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे (बाबूगेणू), वडज आणि येडगाव धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने घोडनदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सध्या गंभीर पूरस्थिती नसली तरी अनेक ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शेतांमध्ये शिरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नदीकाठावरील ऊस, मका, ज्वारी, कडबा, कडवळ आदी उभी पिके पाण्याखाली गेल्याने मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त होत आहे.
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी ९१ टक्क्यांहून अधिक झाली आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा विसर्ग सुरू केला. या विसर्गामुळे घोडनदीला मोठी पाण्याची आवक होत आहे. नदीवरील सर्व २७ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.
घोडनदीमार्गे मोठ्या प्रमाणात पाणी घोड धरणात दाखल होत असल्याने घोड धरणही जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. परिणामी घोड धरणातूनही विसर्ग वाढविला आहे. यापूर्वी ५०० ते १,००० क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग गेल्या काही दिवसांत १० ते १२ हजार क्यूसेक्सपर्यंत वाढविला असून आता तब्बल २० हजार क्यूसेकने पाणी सोडले जात असल्याची माहिती शाखा अभियंता महेश काळे यांनी दिली.
शिरूर शहरासह आमदाबाद, अण्णापूर, तर्डोबाची वाडी, गोलेगाव, निमोणे, गुनाट, मोटेवाडी, कोल्हेवाडी परिसरात नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. विशेषतः गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, मोटेवाडी परिसरातील नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गोलेगाव येथील कृष्णामाईच्या डोहात पाण्याची प्रचंड आवक झाल्याने एकीकडे निसर्गाचे मनोहारी दृश्य निर्माण झाले असले, तरी दुसरीकडे पाण्याचे रौद्ररूप नागरिकांमध्ये भीती निर्माण करीत आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदीपात्र, पूल व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
तातडीने पाहणी करा; शिरूर तहसीलदारांचे आदेश
शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले की, घोडनदीमुळे ज्या भागात पाणी शिरून शेती किंवा इतर नुकसान झाले आहे, त्या सर्व ठिकाणांची महसूल विभागामार्फत तातडीने पाहणी केली जाईल. उभी पिके पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दिले असून अहवाल शासनाकडे पाठवून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.






