पुणेः शहरातील जीबीएसची रुग्णसंख्या वाढत असून आता या दुर्मिळ आजाराने इतर जिल्ह्यातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गुइलेन बॅरी सिंड्रोम अर्थातच जीबीएसच्या आजाराची एकूण रुग्णसंख्या आता २०७ वर जाऊन पोहचली आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पुण्यात अधिक असून, या आजारामुळे मृत्यही झाले आहेत. या आजाराने कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा बळी घेतला असून सांगलीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता या आजाराने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १२ वर जाऊन पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीबीएस आजारामुळे कोल्हापूरात दुसरा बळी गेला आहे. रेंदाळ ढोणेवाडी येथे राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सूरू होते. या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील जीबीएस आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यामध्ये एक रुग्ण १४ वर्षांचा मुलगा होता. तर दुसरा रुग्ण ही ६० वर्षांची वयोवृद्ध महिला होती. यामुळे जीबीएस आजार इतर जिल्ह्यातही फोफावताना दिसत आहे.
आरोग्य विभागाची माहिती
कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात सध्या जीबीएसच्या पाच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. पाच रुग्ण हे व्हेटिंलेटरवर आहेत. तर दोन रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. जीबीएसबाधित संशयितांची एकूण रुग्णसंख्या २०७ वर जाऊन पोहचली असून यापैकी १८० जणांना जीबीएसची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी २० जण हे व्हेटिंलेटर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.