Gavran Mango Price : कोकण हापूसची एक्झिट! आता गावरान आंब्याचा बाजारात धुमाकूळ; पाहा काय आहेत दर
Gavran Mango Price : कोकणातील हापूस आंबा बाजारातून पूर्णपणे गायब; कर्नाटक आणि गावरान आंब्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांची मोठी वाढ.

Gavran Mango Price – कोकणच्या हापूसची आवक थांबल्यानंतर आता कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पुढील १५ दिवस पुणेकरांना कर्नाटक हापूसची चव चाखता येईल. दुसरीकडे गावरान हापूसचा हंगाम बहरला आहे. कोकणचा हापूस नसल्याने कर्नाटकसह गावरान आंब्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे दोन्हींच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यंदा कोकणातील हापूसच्या आधी कर्नाटकची आवक १० ते १५ एप्रिलपासून वाढली. याच काळात कोकणचा हापूसही बाजारात मोठ्या प्रमाणात आला. त्यामुळे कर्नाटक हापूसला तुलनेने कमी भाव मिळाला. आता कोकणातील हापूसची आवक थांबल्यामुळे कर्नाटक हापूसला मागणी वाढली आहे. त्याचवेळी आवक तुलनेत कमी झाली आहे. मागील आठवड्यात ३ ते ५ डझनाच्या १८ हजार पेटींची आवक झाली होती.
त्यामध्ये घट होऊन रविवारी (दि. ३१) १० हजार पेटींची आवक झाली. त्यामुळे भावात तेजी आली आहे. ३ ते ५ डझनाच्या कच्च्या आंब्याच्या पेटीला दर्जानुसार १२०० ते १६०० रुपये भाव मिळत आहे. दुसरीकडे गावरान आंब्याचा हंगाम बहरला आहे. रविवारी (दि. ३१) ६ ते ७ हजार क्रेट्सची आवक झाली. एका क्रेट्समध्ये २० किलो आंबे असतात. ही आवक मागील आठवड्यापेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहे. त्या तुलनेत जास्त मागणी असल्यामुळे भावात वाढ झाली आहे.
“कोकणातील आवक थांबल्यानंतर कर्नाटक हापूसला मागणी वाढली आहे. त्यामुळे कर्नाटक हापूसचे भाव तेजीत आहेत. पुढील १५ दिवस आवक सुरू राहील.”
– रोहन उरसळ, कर्नाटक हापूसचे व्यापारी
“गावरान हापूसचा हंगाम बहरला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांनी आवक वाढली आहे. गावरानमध्ये हापूसपेक्षा केशरची आवक अधिक होत आहे.”
– युवराज काची, गावरान आंब्याचे व्यापारी



