Hapus Mango : चाकणच्या बाजारात हापूसचा थाट! डझनाला मोजावे लागतायत ‘इतके’ रुपये; पाहा का कडाडले भाव
Hapus Mango : अवेळी पाऊस आणि वाढत्या तापमानाचा आंब्याच्या बागांना फटका; उत्पादनात घट झाल्याने चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत दरांचा पारा चढला.

Hapus Mango – चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रत्नागिरी व देवगड येथील प्रसिद्ध हापूस आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, उत्पादनात घट होऊनही बाजारभाव तेजीत कायम असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा हापूस आंब्यांचे दर ८०० ते १२०० रुपये प्रति डझन दरम्यान स्थिरावले असून ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खरेदीला विशेष महत्त्व असल्याने गेल्या काही दिवसांत बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.
हापूससह लालबाग, केशर, बदाम, दशेरी आदी विविध जातींचे आंबेही बाजारात दाखल झाल्याने फळबाजार गजबजलेला दिसत आहे. यंदाच्या हंगामात हवामानातील अनिश्चितता आंबा उत्पादकांसाठी मोठे आव्हान ठरली आहे. फुलोऱ्याच्या काळात अवेळी पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान व आर्द्रतेतील बदल यामुळे आंब्याच्या झाडांवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी फळधारणा कमी झाली, तर काही भागात फळगळ मोठ्या प्रमाणावर झाली.
त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात होणारा हापूस यंदा विविध कारणांमुळे देशांतर्गत बाजारातच अधिक प्रमाणात विक्रीस येत आहे. काही देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे निर्यात कमी झाली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठांवर झाला आहे. मात्र उत्पादन घटल्याने दरांवर फारसा दबाव आलेला नाही.
आंब्याच्या गुणवत्तेनुसार दरात मोठा फरक पडत आहे. आकर्षक रंग, सुगंध व चव असलेला देवगड व रत्नागिरी हापूस ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत असून, दर्जेदार आंब्यासाठी ग्राहक अधिक दर मोजण्यास तयार आहेत. आंबा व्यापारी शहजाद बागवान यांनी सांगितले की, “यंदा उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकून आहेत. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून गुणवत्तेनुसार विक्री होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारभाव अधिक आहे.”
पुढील काही आठवड्यांत आंब्यांची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी उत्पादनाची एकूण स्थिती व निर्यातीतील बदल यावरच दरांचा पुढील कल अवलंबून राहणार आहे. सध्या मात्र चाकण बाजार समिती आंब्यांच्या गोडीने आणि ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ बहरलेली दिसत आहे.






