D.K.Shivakumar : डी. के. शिवकुमार दीर्घकाळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील; ‘या’ ज्योतिष्याने वर्तवले भाकीत
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळतील आणि त्यांचा कार्यकाळ अत्यंत दीर्घ असेल, असे भाकीत एका प्रसिद्ध ज्योतिष्याने केले आहे.

D. K. Shivakumar : कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळतील आणि त्यांचा कार्यकाळ अत्यंत दीर्घ असेल, असे भाकीत एका प्रसिद्ध ज्योतिष्याने केले आहे.
कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी शिवकुमार (D. K. Shivakumar) यांचे नाव आघाडीवर असतानाच या भाकिताला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रसिद्ध ज्योतिष्य द्वारकानाथ गुरुजी यांनी कनकपुरा मतदारसंघाचे आमदार असलेल्या डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी तीन महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत. पीटीआयशी बोलताना द्वारकानाथ गुरुजी म्हणाले, मी त्यांना मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी तीन तारखा सुचवल्या आहेत. त्यामध्ये रविवार (३१ मे), ५ जून आणि ६ जून या तारखांचा समावेश आहे.
शिवकुमार यांचे ग्रहमान अत्यंत मजबूत असून ते केवळ काही काळासाठी किंवा एका टर्मसाठी मुख्यमंत्री होणार नाहीत. ते प्रदीर्घ खेळी खेळतील. त्यांची कुंडली खूप चांगली आहे आणि ते दीर्घकाळ कर्नाटकचे नेतृत्व करतील. तसेच काँग्रेस हायकमांडचे पूर्ण समर्थन त्यांना लाभेल, असा विश्वास गुरुजींनी व्यक्त केला.
शिवकुमार यांच्याकडे राज्यासाठी एक उत्तम दृष्टी असून त्यांच्या कार्यकाळात कर्नाटक अधिक समृद्ध आणि संपन्न होईल, असा आशावादही त्यांनी दाखवला. २०२८ मध्ये होणाऱ्या पुढील विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना गुरुजी म्हणाले, पुढची निवडणूकही निःसंशयपणे डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हेच जिंकतील. तेव्हाच ते खऱ्या अर्थाने मंत्रिपदाचा आनंद घेऊ शकतील. सध्या त्यांच्या खांद्यावर केवळ जबाबदाऱ्यांचे ओझे असेल.






