Team India Head Coach : मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी गौतम गंभीरने ठेवल्या पाच अटी, जाणून घ्या….

नवी दिल्ली – सध्या चालू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वकरंडक २०२४ च्या समाप्तीनंतर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सुरुवातीला एकमेव स्पर्धक होता. राहुल द्रविडच्या जागी तोच नवा मुख्य प्रशिक्षक गौतम होणार हे निश्चित होते. पण भारताचे माजी क्रिकेटपटू डब्ल्यूव्ही रमणही या स्पर्धेत उतरल्याने चांगलीच चुरस रंगणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, गौतम गंभीर व रमण या दोघांनी प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीसमोर (सीएसी) उत्तम सादरीकरण करून दोघांनीही मुलाखतकर्त्यांना प्रभावित केले. असे असलं तरी अजूनही गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआय भारताच्या माजी सलामीवीराची नवीन प्रशिक्षक म्हणून घोषणा करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आता गंभीरने बीसीसीआयसमोर ठेवलेल्या काही अटींची चर्चा होत आहे.
गंभीरने भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी पाच अटी घातल्या होत्या आणि वृत्तानुसार बीसीसीआयने त्या सर्व मान्य केल्या आहेत, असेही समोर आले आहे. पहिली अट अशी होती की, त्याला संघामध्ये अन्य कुणाचा हस्तक्षेप न असता पूर्ण नियंत्रण हवे होते. विश्वचषक विजेत्याने स्वतःचा सपोर्ट स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मागितले. तिसरी अट होती की चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असावी. गंभीरने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा विशेषत: वरिष्ठ खेळाडू म्हणून उल्लेख केला आहे. चौथ्या अटीत गंभीरला पूर्णपणे वेगळा कसोटी संघ हवा होता तर त्याची शेवटची अट म्हणजे, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करण्याची होती.
गौतम गंभीरने घातलेल्या पाच अटी
– संघाचे पूर्ण नियंत्रण, बाह्य हस्तक्षेप नसावा
– सहाय्यक कर्मचारी (सपोर्ट स्टाफ) निवडण्याचे स्वातंत्र्य
– चॅम्पियन्स ट्रॉफी ही वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असेल
– वेगळा कसोटी संघ
– २०२७ विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करा.





