Gas Tanker Brake Fail – रायगड जिल्ह्यातील बोरघाट परिसरात सोमवारी (दि. २३) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास संभाव्य भीषण दुर्घटना थोडक्यात टळली. कोचीहून गुजरातकडे २१ टन क्षमतेचा प्रोपेलीन गॅस वाहून नेणारा टँकर घाटमार्गावर येत असताना अचानक ब्रेक निकामी झाल्याची घटना घडली. तीव्र उतार आणि धोकादायक वळण असलेल्या बोरघाटात टँकर अनियंत्रित झाला असता तर मोठ्या प्रमाणावर जीवित व पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, टँकर ((एनएल ०१ एएफ ५०४०) घाटातील उतारावर येत असताना चालकाच्या लक्षात आले की, वाहनाचे ब्रेक व्यवस्थित कार्यरत नाहीत. समोर तीव्र उतार असल्याने वाहनाचा वेग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. परिस्थितीची गंभीरता ओळखून चालकाने धाडसाने निर्णय घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला जाणीवपूर्वक टँकर धडकवून वाहन नियंत्रित केले. या निर्णयामुळे टँकर जागीच थांबला आणि संभाव्य भीषण स्फोट किंवा गळतीचा धोका टळला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, आयआरबीची पेट्रोलिंग टीम, अग्निशमन यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, हेल्प फाउंडेशनची टीम तसेच इतर पेट्रोलिंग वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. घाटातील वाहतूक व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यात आला. क्रेन आणि पुलरच्या सहाय्याने टँकर अपघातस्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मोकळ्या जागेत हलविण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि महामार्ग वाहतूक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरटीओ अधिकारी रावते यांनी वाहनाची तांत्रिक तपासणी करून प्राथमिक अहवाल नोंदविला. खोपोली पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.