प्रभात वृत्तसेवा पिंपरी – अहिल्यादेवी चौक परिसरात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस आणि त्यांच्या मदतनीसांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवार (दि. ५ जानेवारी) सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथे घडली.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत चव्हाण यांनी मंगळवारी (दि. ६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदन संजय बगाडे (वय २४, रा. भोसरी), लहू बाळासाहेब बगाडे (वय ३०, रा. चिंचवड स्टेशन) आणि अक्षय माउली गालफाडे (वय ३०, रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे वॉर्डन मदतनीस सरकारी काम करत असताना आरोपींनी त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. आरोपींनी फिर्यादींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांच्यासोबत असलेल्या वॉर्डनना हाताने मारहाण केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.