Gas Shortage : गॅस सिलेंडरसाठी ‘वेटिंग’ आणि चुलींना ‘डिमांड’! मावळात महिलांची मोठी कोंडी
Gas Shortage : गॅस सिलेंडरच्या प्रतीक्षेत मावळकर त्रस्त; लाकूड फाटा आणि चुलींचा आधार घेण्याची वेळ, कारागिरांच्या व्यवसायाला मात्र आले सुगीचे दिवस.

Gas Shortage – आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट ग्रामीण भागावरही जाणवू लागला आहे. मावळ तालुक्यात गॅस सिलेंडरचा पुरवठा उशिरा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये गृहिणी पुन्हा पारंपरिक मातीच्या चुलींचा आधार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे.
स्वयंपाकासाठी पर्यायी साधन म्हणून चुलींचा वापर वाढला असून, त्यामुळे लाकूड व इतर इंधनांच्या मागणीतही वाढ झाली आहे. काही ठिकाणी नागरिक इलेक्ट्रिक शेगडीचाही वापर करताना दिसत आहेत. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात घरोघरी मातीच्या चुलीवर स्वयंपाक केला जात असे. मात्र, शासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेमुळे अनेक गरीब महिलांना गॅस सुविधा उपलब्ध झाली आणि धुरापासून काही प्रमाणात मुक्तता मिळाली होती. आता मात्र गॅस टंचाईमुळे पुन्हा जुने दिवस परतल्याचे चित्र आहे.
महिलांची कोंडी वाढली
गॅस सिलेंडर वेळेवर न मिळाल्याने महिलांना स्वयंपाकासाठी चुलींचा आधार घ्यावा लागत आहे. चुलीवर स्वयंपाक करताना अधिक वेळ आणि मेहनत तसेच, धुरामुळे डोळे व श्वसनास त्रास होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
गृहिणींची प्रतिक्रिया
“गॅस वेळेवर मिळत नसल्यामुळे रोजच्या स्वयंपाकाचे नियोजन करणे कठीण झाले आहे. चुलीवर स्वयंपाक करताना जास्त वेळ आणि मेहनत लागते. धुरामुळे डोळ्यांनाही त्रास होतो,”
– शिलाबाई पोपट येवले, गृहिणी
कारागिरांना दिलासा
मातीच्या चुलींची मागणी वाढल्यामुळे चूल बनविणाऱ्या कारागिरांना मात्र या परिस्थितीतून काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. अनेक ठिकाणी चुलींची नव्याने मागणी वाढली असल्यामुळे त्यांना सुगीचे दिवस आले आहेत.





