Gas Shortage : बुकिंग झाले, मेसेज आला; पण सिलिंडर गायब! गॅस एजन्सीचा हा खेळ नेमका काय?
Gas Shortage : युद्धजन्य परिस्थितीचा बहाणा आणि केवायसीचा गोंधळ; म्हावशे इंडेन गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या संतापाचा उद्रेक.

Gas Shortage – आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धाचा अप्रत्यक्षपणे फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. त्यामुळे बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील इंडेन गॅसच्या म्हावशे इंडेन या ग्राहक केंद्रासमोर गॅसधारकांच्या रांगा लागल्या आहेत. सरकारच्या नवीन धोरणानुसार ग्राहकाने केवायसी करणे अनिवार्य केले असून केवायसीधारक व गॅसधारकाची झुंबड उडाली असून म्हावशे इंडेनच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य नियोजन नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.
याचा त्रास विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना सोसावा लागत आहे. नागरिकांनी गॅस बुकिंग केल्यानंतर त्यांना सिलिंडर वितरण केल्याचा फोनवर संदेश येत आहे. पण प्रत्यक्षात ग्राहकांना सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक दुकानाकडे धाव घेत असून दुकानदार उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सौ वैशाली राजेमाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित ग्राहक केंद्र चालकास पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले असून इंडेन कंपनीच्या प्रतिनिधीच्या संपर्कात असल्याचे सांगितले. याबाबतीत नागरिकांनी नगरसेविका सौ वैशाली राजेभोसले यांची प्रत्यक्ष भेट घेवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
सिलिंडरचा काळाबाजार सुरु
ग्राहकांनी या बाबतीत संबंधीत दुकानदार व कर्मचारी जबाबदार असून सध्या काळ्या बाजारात सिलिंडर 3 हजार रुपयांना मिळत असल्याने दुकानदार व कर्मचारी संगनमताने सिलेंडर व्रिकी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच हक्काच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून कामधंदा सोडून रांगेत उन्हात उभे रहावे लागत असल्याची खंत बोलून दाखवली.





