नाशिकमध्ये गॅस दरवाढीची होळी, सरकारविरोधात घोषणाबाजी

नाशिक – सातत्याने गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत चालल्या आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, आज होळीच्या दिवशी नाशिक येथिल महिलांनी ‘होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’ अशी घोषणाबाजी सरकारविरोधात केली. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुटपाथवर चूल पेटवत अनोखे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. गॅसच्या किंमती 1100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. सर्वसामान्यांचा सरकारवरील रोष तीव्र होत चालला आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महिलांनी चूल पेटवून आंदोलन केले. गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.
यावेळी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फुटपाथवर चूल मांडून चहा देखील बनवला. दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचे फलक दाखवून निषेध नोंदवला. एकीकडे जनता अगोदरच महागाईने त्रस्त असून त्यातच आता सरकारने गॅस दरवाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे. त्यामुळे आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.
दरम्यान, गॅसच्या किंमती 1 हजार 103 रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. गेल्या चार वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतीत 56 टक्के दरवाढ झाली आहे.





