Gas Cylinder Scam : गॅस ग्राहकांनो सावधान! बुकिंग न करताच सिलिंडर ‘डिलिव्हर’; पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा घोटाळा?
Gas Cylinder Scam : घरगुती सिलिंडरचा हॉटेल आणि ढाब्यांसाठी सर्रास वापर; पिंपरी-चिंचवडमधील वितरण व्यवस्थेवर ग्राहकांचे गंभीर प्रश्नचिन्ह.

Gas Cylinder Scam – व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती गॅस सिलिंडर काळाबाजार वाढण्याची शक्यता तीव्र झाली आहे. आधीच काही गॅस एजन्सींच्या संशयास्पद कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्राहकांनी बुकिंग न करता त्यांच्या नावावर सिलिंडर ‘डिलिव्हर’ झाल्याचे मेसेज येत असल्याने वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील अनेक ग्राहकांना अचानक गॅस बुकिंगचे संदेश प्राप्त होत असून, काही वेळातच ‘डिलिव्हरी पूर्ण’ झाल्याचेही दाखवले जात आहे. प्रत्यक्षात ग्राहकांनी कोणतेही बुकिंग केलेले नसताना त्यांच्या नावावर सिलिंडर उचलला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे संबंधित सिलिंडर नेमका कुठे जातोय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या संदर्भात गॅस एजन्सीकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न देता ‘बुकिंग आपोआप होते’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे नेहरूनगर येथील नागरिकांनी सांगितले. या प्रकारामुळे ग्राहकांच्या खात्यावर सबसिडीचा गैरवापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा पद्धतीने ग्राहकांच्या नावावर सिलिंडर दाखवून तो चढ्या दराने हॉटेल व्यावसायिकांना विकण्याचा प्रकार सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे घरगुती गॅस वितरणात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, व्यावसायिक १९ किलो गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाली असून, पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात त्याची किंमत सुमारे तीन हजार १०० च्या घरात पोहोचली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल, ढाबे, खानावळ चालक तसेच हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वाढत्या खर्चामुळे अनेक लहान व्यावसायिक स्वस्त पर्याय म्हणून घरगुती गॅसचा वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य असतानाही, वाढत्या दरांमुळे हा प्रकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः एजन्सींच्या माध्यमातूनच सिलिंडर वळवले जात असल्याचा संशय व्यक्त होत असून, हा प्रकार वेळीच रोखला नाही तर मोठ्या प्रमाणात काळाबाजार फोफावू शकतो. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे, कारण त्यांना वेळेवर गॅस मिळणे कठीण होऊ शकते.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शहरातील गॅस वितरण व्यवस्थेतील या गोंधळामुळे प्रशासनाची भूमिकाही प्रश्नचिन्हात आली आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच वितरण प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पारदर्शकता वाढवणे, बोगस बुकिंग थांबवणे आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. व्यावसायिक गॅस दरवाढ आणि एजन्सींच्या संशयास्पद कारभारामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅसच्या काळाबाजाराचे सावट गडद होत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.





