कानपूरजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळले गॅस सिलिंडर; एका महिन्यातील पाचवी घटना, घातपात करण्याचा डाव फसला

कानपूर – कानपूर सेंट्रलजवळ असलेल्या प्रेमपूर रेल्वे स्थानकापासून काही मीटर अंतरावर रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर आढळून आले आहे. यावेळी लोको पायलटने तातडीने ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना प्रेमपूर रेल्वेस्थानकाजवळ घडली.
विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्याभरातील ही पाचवी घटना आहे. त्यामुळे रेल्वेचे अपघात घडवून आणण्यासाठी कट रचला जातो आहे का? अशी चर्चा रंगु लागली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, कानपूर सेंट्रल आणि फत्तेपूरदरम्यान प्रेमपूर हे छोटेसे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकापासून काही मीटर दूर रेल्वे रुळावर सिलिंडर आढळून आले आहे.
आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास या रुळावरून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाच्या ही बाब लक्षात आली. यावेळी त्याने आपातकालीन ब्रेक लावले. त्यामुळे मालगाडीचा अपघात टळला.
या घटनेची माहिती मालगाडीच्या चालकाने रेल्वेच्या गार्डला, तसेच स्टेशन मास्टर आणि रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता, त्यांना रुळावर लाल रंगाचे ५ लिटरचे रिकामे सिलिंडर आढळून आले.
यासंदर्भात बोलताना, अशा प्रकारचे सिलिंडर घरघुती वापरात किंवा मुलांच्या वसतीगृहात वापरले जातात. हे सिलिंडर आम्ही जप्त केले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. अशी माहिती जीआरपीचे एसएचओ ओम नारायण सिंह यांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. १० सप्टेंबर रोजी रेल्वे रुळावरून गॅस सिलिंडर ठेऊन कालिंदी एक्सप्रेस रुळावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.





