सातारच्या प्रभाग 16 मध्ये कचरा संकलन ठप्प

कृष्णानगर – पावसाळा तोंडावर आला असूनही, सातारा नगरपालिकेकडून प्रभाग 16 मध्ये कचरा संकलन आणि नाले व ओढ्यांची सफाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. प्रभाग 16 हा अनेक वर्षांपासून त्रिशंकू भागात मोडत होता. हद्दवाढीनंतर हा भाग सातारा पालिका हद्दीत आला आहे.
या प्रभागात यशवंत कॉलनी, सत्यम कॉलनी, देवी कॉलनी, विसावा नाका, कल्याणी परिसर, गोडोली, ठक्कर सिटी आणि बॉम्बे रेस्टॉरंट चौक या भागाचा समावेश होतो. या परिसरात हॉटेल्स, शैक्षणिक संकुले, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि ढाबे आहेत. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून कचर्याचे ढीग वाढत आहेत. घंटागाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. ठक्कर सिटी भागातील घंटागाडी गेल्या पाच दिवसांपासून गायब आहे. देवी कॉलनी, ठक्कर सिटी या भागात एक दिवसाआड घंटागाडी येत आहे.
या भागातील हॉटेल व रेस्टॉरंटस्मधील सांडपाणी, खरकटे, वाया गेलेले अन्न, कचरा गटारांमध्ये टाकला जात असल्याने, ती तुंबत आहेत. नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या असल्या, तरी पालिका प्रशासन हॉटेलचालकांना पाठीशी घालत आहे. गेल्याच आठवड्यात बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील व्यापारी संकुलामधील हॉटेलमुळे तुंबलेले गटार दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर जेसीबीच्या सहाय्याने मोकळे करण्यात पालिकेला यश आले. या भागातील सर्व ओढे जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुंबलेल्या गटारांचीही सफाई पालिकेच्या आरोग्य विभागाने करणे गरजेचे आहे.
नव्याने कार्यभार हाती घेतलेले आरोग्य विभागप्रमुख राठोड हे ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पालिकेचे अधिकारी, मुकादम, सफाई कामगार व ठेकेदारांना घेऊन प्रभाग 16 ची पाहणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या भागातील कचरा संकलन व्यवस्थित न झाल्यास नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.





