Ganpati Visarjan 2023 : ‘श्री गणाधीश रथा’मध्ये निघणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक

पुणे – गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी पुण्यातील भक्तगण सज्ज झाले आहेत. गुरूवारी (दि.28) सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार आहे.
यंदाही मानाच्या आणि अन्य प्रमुख गणपती मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथके, बॅंड, ध्वजपथक या शिवाय विविध संस्था, संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन त्यांनी तयार केले आहे. तर दुसरीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची देखील उद्याची सर्व तयारी झाली आहे.
यंदा अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत “श्री गणाधीश रथा’मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai ganpati) विराजमान होणार आहे. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असेल.
प्रभात, दरबार ही बॅंडपथके, स्व-रूपवर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडा असेल. दरवर्षी मिरवणुकीला होणारा उशीर लक्षात घेत यंदा बेलबाग चौकातून दुपारी चार वाजता मंडळाची मिरवणूक सुरू होणार असून लक्ष्मी रस्त्याने गणपती मार्गस्थ होईल, अशी माहिती मंडळाने दिली.





