बीडमध्ये गँगवॉर, फडणवीसांनी गृहखात्याचा मोह सोडावा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले गँगवॉर आता जेलमध्ये पोहोचले आहे. पोलीस आणि गृहविभाग काय करत आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
बीडच्या रस्त्यावर सुरू असलेले गँगवॉर आता जेलमध्ये पोहोचले आहे. पोलीस आणि गृहविभाग काय करत आहे? असा सवालही त्यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाला आहे असे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच उदयास आले आहेत.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची मजाल इतकी वाढली आहे की आता बीडच्या जेलमध्येच कराड आणि गित्ते या दोन टोळ्यांमध्ये गंगवार सुरू झाले आहे. त्यामुळेच बीड कारागृहातून महादेव गित्तेसह काही आरोर्पीना छत्रपती संभाजी नगरच्या हसूल कारागृहात हलवल्याचे वृत्त येत आहे. आता बीडचे जेलही सुरक्षित नाही, ही चिंतेची बाब आहे, अशी टीका त्यांनी केली.
महायुतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते. त्यामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली. मात्र, गेल्या काही दिवसांत सरकारच्या आणि विशेषत: गृहविभागाच्या गलथानपणामुळे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा लागला आहे.
महाराष्ट्राची तुलना उत्तरेतल्या राज्यातल्या जंगलराजसोबत होऊ लागली आहे, अशी खंत हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा अशी मोठी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
फडणवीसांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे. त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचे विकेंद्रीकरण नको असून त्यांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नसून सध्या सगळीकडे अधिकारी राज आहे, या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून थेट फोन येतो, असे वक्तव्य हर्षवर्धन सकपाळ यांनी केले.





