Pune Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या मदतीला २०० पोलीस मित्र
Pune Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मित्र संघटनेचे २०० सदस्य पोलिसांना सहकार्य करणार आहेत.

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांच्या मदतीला पोलीस मित्र संघटनेचे २०० सदस्य सहभागी झाले आहेत. यामध्ये पुण्यासाठी १००, तर पिंपरी-चिंचवडसाठी १०० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी दिली.
गणेशोत्सवात पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो. पोलिसांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने पोलीस मित्र संघटना गेल्या १२ वर्षांपासून काम करत आहे. गर्दीचे नियंत्रण, गर्दीत हरवलेल्या व्यक्तींना पोलीस केंद्रापर्यंत पोहोचवणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना सहकार्य करण्याचे काम सदस्य विनामोबदला करतात.
पुण्यात बेलबाग चौक, दगडूशेठ गणपती परिसर ते मंडई भागात पोलीस मित्र पोलिसांसोबत काम करत आहेत. यात महिला सदस्यांचाही समावेश आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अलका टॉकीज चौकातही सदस्य पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे कपोते यांनी सांगितले.





