Ganeshotsav: अटल सेतू ते मुंबई-गोवा हायवे…गणेशोत्सवानिमित्त कोकण प्रवासावर टोलमाफी; असा मिळवा विशेष पास
Ganeshotsav: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ११ ते २७ सप्टेंबर दरम्यान टोलमाफी; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती.

Ganeshotsav – गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा शासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मुंबई- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर दि. ११ ते दि. २७ सप्टेंबर या कालावधीत ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही पथकरमाफीचा लाभ मिळणार आहे,
से त्यांनी सांगितले. गणेशोत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो कुटुंबीय गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात. या काळात मुंबई- गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. गणेशभक्तांचा हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा,
तसेच त्यांना प्रवासादरम्यान अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत शासन परिपत्रक काल दि. ८ रोजी जारी केले आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस,
वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे.
परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या तसेच आरटीओ कार्यालयांमध्येही पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरला जाणार असल्याने कोकणातून परतताना गणेशभक्तांना पुन्हा टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
गणेशोत्सवासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसनाही पथकरमाफीची सुविधा देण्यात येणार आहे. कोकणाकडे रवाना होणाऱ्या एसटी बससाठी आवश्यक पास संबंधित पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. पथकरमाफीचा पास बसला लावून किंवा दाखवून संबंधित बसना टोल नाक्यावरून सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.





