Ganeshotsav 2026: यंदा गणेशभक्तांची चांदी! तब्बल ९ वर्षांनंतर आला ‘हा’ दुर्मीळ योग; बाप्पांचा मुक्काम २ दिवस वाढला
Ganeshotsav 2026: दोन अतिरिक्त दिवस मिळणार असल्याने मंडळांकडून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांवर भर; पुढील असा योग थेट २०३५ मध्येच येणार.

Ganeshotsav 2026 – लाडक्या गणरायाच्या आगमनाची शहरात जोरदार तयारी सुरू असतानाच यंदाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य समोर आले आहे. यंदा गणेशभक्तांना बाप्पांची सेवा तब्बल १२ दिवस करता येणार आहे. दरवर्षी साधारणपणे १० दिवस चालणारा उत्सव यंदा दोन दिवसांनी वाढला आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर हा विशेष योग आला आहे.
यापूर्वी २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव झाला होता. त्यानंतर यंदा पुन्हा तसा योग जुळून आला आहे. त्यामुळे घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, सांगवी आणि परिसरात गणेशमूर्तींचे स्टॉल सजले आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे.
सार्वजनिक मंडळांनीही तयारीला वेग दिला आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणुकांसाठी ढोल-ताशा पथके निश्चित केली जात आहेत. वाद्यवृंदांनाही मागणी वाढली आहे. अनेक मंडळांनी पथकांना आगाऊ बुकिंग केले आहे. मंडप उभारणीची कामे सुरू आहेत. आकर्षक कमानी उभारल्या जात आहेत. रोषणाईचे नियोजन केले जात आहे. विविध देखावे आणि सजावटीची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.
यंदा दोन अतिरिक्त दिवस मिळणार असल्याने मंडळांनी कार्यक्रमांचे नियोजनही वाढविले आहे. सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधनपर उपक्रम घेण्यावर भर दिला जात आहे. काही मंडळांकडून भव्य देखावे उभारण्याची तयारी सुरू आहे. या वाढीमागे पंचांगातील तिथींचे गणित आहे. यंदा भाद्रपद शुक्ल तृतीया आणि चतुर्थी एकाच दिवशी आल्या आहेत.
त्यामुळे तृतीयेलाच अनेक ठिकाणी गणरायाचे आगमन होत आहे. आगमनापासून अनंत चतुर्दशीपर्यंतचा कालावधी १२ दिवसांचा ठरत आहे. दर तीन वर्षांनी हिंदू पंचांगात अधिक महिना येतो. त्याचा परिणाम तिथींच्या क्रमावर होतो. काही वेळा तिथीचा क्षय होतो. तर काही वेळा तिथीची वृद्धी होते. यंदाचा १२ दिवसांचा गणेशोत्सव हा याच पंचांगीय गणिताचा परिणाम आहे.
यानंतर थेट २०२५ मध्येच असा योग
यंदाच्या उत्सवामुळे शहरातील गणेशभक्तांना बाप्पांच्या भक्तीसाठी दोन दिवस अधिक मिळणार आहेत. त्यामुळे उत्सवाचा जल्लोषही अधिक काळ अनुभवता येणार आहे. यापुढे १२ दिवसांचा असा योग पुन्हा २०३५ मध्ये येणार आहे. त्यानंतर २०४४ आणि २०५३ मध्येही हा योग जुळून येईल. त्यामुळे यंदाचा १२ दिवसांचा गणेशोत्सव गणेशभक्तांसाठी विशेष ठरणार आहे.






