Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव आंतरराष्ट्रीयस्तरावर नेणार – गिरीश महाजन

मुंबई – राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच आपल्या पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवाला (Ganeshotsav) आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनात्मक प्रसिध्दी देऊन राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाद्वारे
दि. 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.
महाजन म्हणाले, या महोत्सवादरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार व समाजमाध्यम प्रभावक तसेच विदेशी वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित करुन त्यांना
मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच रत्नागिरी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सहाकार्याने त्यांना गणेश दर्शनाची थेट सुविधा तसेच आपल्या सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सदर महोत्सवांतर्गत गेटवे ऑफ इंडिया येथे श्री गणेशाच्या विविध स्वरुपांवर केंद्रीत विशेष सांस्कृतिक केंद्रांची उभारणी, वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन, गेटवे ऑफ इंडियाच्या भव्य दर्शनी भागावर प्रोजेक्शन मॅपींगच्या माध्यमातून देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम, महाराष्ट्राचे पारंपारिक आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन घडविणारे वारली कलेचे कार्यशाळा,
विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तुचे कलादालन, महाराष्ट्राच्या पारंपारिक कला व लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम इ. सदर 10 दिवशीय गणेशोत्सव महोत्सवतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत.





