मुंबई – करोना महामारीनंतर पुन्हा एकदा राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईतील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा पुन्हा एकदा लालबाग परिसरात विराजित झाला आहे. तसेच, या लालबाग राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
विशेष म्हणजे गणेशोत्सव सुरू होऊन चार दिवस झाले असून, लालबागच्या राजाची दानपेटी मोजण्यात आली. त्यावेळी पहिल्या चार दिवसांत तब्बल 1.50 कोटींचे दान जमा झाले आहे.
लालबागच्या राजाने हा एक नवा विक्रमच केला आहे. चार दिवसांत करोडो गणेशभक्तांनी लालबाग राजाचे दर्शन घेतले. लालबाग राजाच्या दानपेटीत रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी देखील भक्तांनी अर्पण केली आहेत. यात सुमारे 200 तोळे सोने आणि 1700 तोळे चांदीचे दान दानपेटीत जमा झाले आहे.