Ganesha festival: यंदा ‘गणपती बाप्पा’ महागणार! मूर्तींच्या किमतीत थेट २० टक्क्यांपर्यंत वाढ; काय आहे कारण?
Ganesha festival: पिंपरी-चिंचवडमधील कार्यशाळांमध्ये अंतिम रंगरंगोटीला वेग; महागाईचा फटका बसूनही बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्तांमध्ये उत्साह कायम.

Ganesha festival – गणेशोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक असताना पिंपरी-चिंचवडमध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. शहरातील मूर्तीकारांच्या कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, यंदा कच्च्या मालासह रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक आणि मजुरीच्या वाढलेल्या खर्चामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत सरासरी २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांना बाप्पाच्या स्वागतासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, पिंपळे सौदागर, निगडी, आकुर्डी आणि परिसरातील अनेक कार्यशाळांमध्ये सध्या गणेशमूर्तींवर अंतिम रंगरंगोटी, अलंकार बसविणे आणि आकर्षक सजावटीची कामे सुरू आहेत. दिवसरात्र मेहनत घेत कारागीर विविध आकारांच्या आणि देखण्या मूर्ती साकारत आहेत. यंदाही पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना नागरिकांकडून चांगली मागणी असल्याचे मूर्तीकार सांगत आहेत.
मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), शाडू माती, फायबर, लाकूड, रंग, वार्निश आणि सजावटीच्या साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच वीजदर, मजुरी आणि वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली असून दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.
बुकींगला सुरुवात
महागाईचा फटका बसला असला तरी गणेशोत्सवाचा उत्साह मात्र कायम आहे. अनेक गणेशभक्तांनी आतापासूनच आपल्या आवडीच्या मूर्तींचे बुकिंग सुरू केले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीसाठीही विविध संकल्पनांवर आधारित मूर्ती तयार केल्या जात आहेत. यंदा साधेपणा, पारंपरिक स्वरूप आणि पर्यावरणपूरक संकल्पनांना अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
शाडू माती, रंग, फायबर, पीओपी आणि इतर कच्च्या मालाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाहतूक आणि मजुरीचाही खर्च वाढला आहे. त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे २० टक्के वाढ करावी लागली. तरीही दर्जेदार आणि पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यावर आमचा भर आहे. गणेशभक्तांनी स्थानिक कारागिरांकडून मूर्ती खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा स्थानिक मूर्तीकार व्यक्त करीत आहेत.




