Ganesh Visarjan | १३२ वर्षांची परंपरा आणि सुवर्णरथातील बाप्पा ; अखिल मंडई मंडळाची थाटात मिरवणूक
प्रभात वृत्तसेवा
पुणे – एकमेवाद्वितीय अशी अतिशय मोहक रूप असलेली अखिल मंडई मंडळाची शारदा गणेशाची मूर्ती श्रीगणेश सुवर्णयान रथातून विसर्जनाला निघाली आणि भाविकांच्या तोंडून अहाहा…, असे उद्गार निघाले नाहीत, तरच नवल! रथाच्या माथ्यावर फडकत असलेला भगवा ध्वज आणि हायड्रोलिक पद्धतीने उंच होत असलेली प्रभू श्रीराम यांची मूर्ती अशा या श्री गणेश सुवर्णयान रथात विराजमान होऊन अखिल मंडई मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक थाटात पार पडली.
शारदा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बेलबाग चौकापासूनच पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. जहाजासारखे स्वरूप असलेल्या रथाचा आकार २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद असा होता. रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जहाजाच्या वर सर्च लाइट तसेच आकर्षक कंदील लावण्यात आले होते. मेट्रोच्या लकडीपूल येथील पूलामुळे रथाची उंची कमी करण्यासाठी हायड्रोलिक तंत्रज्ञान वापरण्यात आले होते.
जे हालते होते, त्याची उंची कमी करता येणारी होती. तसेच, बेलबाग चौकात विना आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री सव्वा अकरा वाजता जयंत नगरकर बंधू यांचा नगारा, त्यानंतर न्यू गंधर्व बँड तसेच शिवगर्जना ढोल पथक बेलबाग चौकात वादन झाले. रात्री ११:४७ वाजता शारदा गणेशाचा रथ बेलबागचौकात आला. तेथे पोलिसांचा निषेध करून रथ आरतीविना पुढे नेण्यात आला. पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी कृत्रिम हौदात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.





