पुणे | गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – युवा उद्योजक पुनीत बालन यांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना व्यावसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा ग्रूपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केली आहे.
पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाचे कार्यकर्ते आणि ढोल ताशा पथकातील वादक यांच्या वतीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपतीची आरती त्यांच्या हस्ते झाली. त्यानंतर अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आणि निंबाळकर तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या वतीने बालन यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. ज्याला काही काम-व्यवसाय नाही तो गणपती मंडळाचे काम करतो अशी सर्व साधारण लोकांची धारणा असते,
तसेच हा कार्यकर्ता महिना दीड महिना आपल्या नोकरी-व्यवसायाची पर्वा न करता बाप्पाचे काम तन मन लावून करत असतो, असे बालन मनोगतात म्हणाले.
गणेश मंडळाचा कणा म्हणजे कार्यकर्ता तो टिकला पाहिजे, तो जगला पाहिजे त्याला समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याच्याकडे आदराने पाहिले पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांना व्यवसायासाठी पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून तीन कोटी रुपये आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा बालन यांनी यावेळी केली.
या निधीतून दरवर्षी १०० ते ३०० कार्यकर्त्यांना आर्थिक मदत करण्यात येईल. प्रत्येक वर्षी मदतीमध्ये वाढ होईल असेही बालन यांनी स्पष्ट केले. या घोषणेचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
रवींद्र माळवदकर, पराग ठाकूर, उदय जगताप, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. श्री देवेदेवेश्वर सारसबाग संस्थेचे विश्वस्त रमेश भागवत, प्रसाद कुलकर्णी, विकास पवार, हेमंत रासने, दत्ता सागरे,
अनिल सकपाळ, संजीव जावळे, शिरीष मोहिते, सुरेश जैन, पियुष शहा,आशुतोष देशपांडे तसेच बहुसंख्य गणेशोत्सव मंडळाचे, जय गणेश व्यासपीठाचे कार्यकर्ते आणि ढोल ताशा पथकातील वादक उपस्थित होते. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले; श्रीकांत शेटे यांनी आभार मानले.





